Maharashtra Rain : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व सीमाभागातील हुलसूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस होऊन जामखंडी येथील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र -कर्नाटकाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, औराद परिसरात एका तासात ६० मिमी पाऊस होऊन अनेक घरे व दुकानात पाणी शिरले आहे.
औराद परिसरात सोमवारी चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. केवळ तासाभरात ६० मी.मी. पाऊस पडल्याची नोंद येथील हवामान केंद्रात झाली आहे. या पावसामुळे औराद परिसरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये आणि व्यापारी दुकानांमध्ये पाणी घुसले
तर राष्ट्रीय महामार्ग लातूर – जहिराबाद वरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्याने सदर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाली आहे. शिवाय औरादसह परिसरातील तगरखेडा, हालसी, मानेजवळगाव, सावरी व बोरसुरी आदी गावातील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिक अडकून पडले आहेत
दरम्यान तेरणा नदी नदीवरील औराद येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची दोन दारे पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत. महामार्ग शेजारील नाल्या बांधकाम व्यवस्थित न झाल्याने महामार्गाचे पाणी शेजारील अनेक व्यापारी दुकानांमध्ये घरामध्ये घुसले आहे.
महामार्ग शेजारील वसंतराव पाटील विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय, सिध्देश्वर भोजनालय आदींसह हाँटेल, किराणा दुकान, फर्रिटालयझर्स आदी व्यापारी दुकानात व घरामध्ये पाणी घुसल्याने लाखोचे नुकसान झाले आहे.