मांगूर व्यावसायिकांचे धाबे दणाणले ! मांगूर माशाच्या व्यावसायिकावर कारवाई

Ahilyanagarlive24 office
Updated:

रायगड : आरोग्याला घातक असलेल्या मांगूर माशांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर माजगावमध्ये कारवाई करण्यात आली. माजगावमध्ये मांगूर मत्स्यपालन होत असल्याची तक्रार पाताळगंगा नदी संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी केली होती. त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्याने गुरुवारी पाताळगंगा माजगाव हद्दीत पौधनजीक ४८ मांगूर तलावांची मत्स्यविभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

मांगूर माशांचा खच सापडल्याने पंचनामा करून खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी माजगाव येथे अब्दुल रझाक काझी यांच्या मत्स्यसंवर्धन तलावात मोठ्या प्रमाणात मांगूर माशांचा खच सापडला. परिसरात कोंबड्यांची पिसे आढळून आली. तसेच उग्र वासामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

अधिकारी कारवाईसाठी घटनास्थळी पोहचायच्या आत तेथील कर्मचारी पळून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित व्यावसायिकांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

याअगोदर नुकताच खालापूर तालुक्यातील महड, हाळ, धामणी आदी ठिकाणी मत्स्यविभागाकडून कारवाई करीत तळावात जाळे टाकून मांगूर मासे काढण्यात आले. मत्स्य आयुक्तांनी केलेल्या कारवाईने अवैध मांगूर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

मांगुर मत्स्यपालन करण्यास राष्ट्रीय हरीत लवादाने बंदी आणली आहे. ग्रामस्थांनी व्यावसायिकांना आपली जागा भाड्याने देताना त्या जागेवरील तलावात खेकडे पालन, कोळंबी पालन, राऊ, कटला आदी मत्स्य पालन करावे. काही व्यावसायिकांकरिता पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता वापर झाल्यानंतर खराब पाणी पाताळगंगा नदीत सोडत आहेत. – अरुण जाधव, अध्यक्ष, पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe