MLA Nilesh Lanke : विकासकामांची खोटी भूमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला !

Ahmednagarlive24 office
Published:
MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : हल्ली विकासकामांची खोटी भूमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला असून, आमची सोशलमीडियावर विकासकामांच्या मंजुरीची पोस्ट पडली की, त्यावरील आमचा फोटो काढून त्यांचा फोटो लावून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

पोष्टमधील वाक्य तेच, काना, मात्रा वेलांटी, उकारही सगळं तसंच ! आरे काय धंदा आहे ? आरे तुम्ही मंजूर करून आणा आम्ही काही म्हणणार नाही. आपली सवय आहे, आपलं ते आपलं, दुसऱ्याला आपण कधी आपलं म्हणत नाही, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

गटेवाडी येथे रेनवडी-चोभूत- वडनेर- निघोज – पिंपरी जलसेन गांजीभोयरे- पानोली गटेवाडी, या ४ कोटी २० लाख रूपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे होते.

आ. लंके पुढे म्हणाले, आम्ही विकासकामांसाठी मोठा निधी आणला. विरोधक मात्र आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेण्याचा कालच प्रयत्न झाला. वडनेर हवेलीमध्ये सरपंचाने दोन, चार लोक सोबत घेऊन स्वतःच फलक लावला. १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी सरपंच कोठून आणणार?

ज्यांना आयुष्यात कधी गुलाल मिळाला नाही ते तेथे चार सहा लोकांना घेऊन नारळ फोडायला आले होते. आज आम्ही भुमिपूजने करतो आहोत, येथे अधिकारी, ठेकेदार उपस्थित आहेत. पूर्वीही अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जायचा. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यामुळे अधिकारीही न जुमानता आमच्या कार्यक्रमांना येऊ लागले असल्याचे सांगत लंके यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

या वेळी पारनेरचे उपनगराध्यक्ष राजू शेख, अर्जुन भालेकर, विजय पवार, दिपक पवार, संदीप सालके, भाऊसाहेब भोगाडे, अमोल यादव, अशोक रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अशोक घुले, वैभव गायकवाड, कारभारी पोटघन, सतीश भालेकर, उमाताई बोरुडे, पुनम मुंगसे, सुनिल करंजुले, श्रीकांत चौरे, अनिल गंधाक्ते दिपाली औटी, पाकिजा शेख. संदीप चौधरी, अमित जाधव, सरपंच मंगल गट, उपसरपंच सुनील पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नेते चंद्रकांत गट व कवी अशोक पवार यांनी केले. सूर्यकांत गट यांनी आभार मानले.

हे रस्ते पूर्वी जिल्हा परिषदेकडे होते. ते आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेतल्यामुळे या रस्त्यांसाठी मोठया प्रमाणावर निधी टाकता आला. राज्य शासनाने निधी मंजूर केला असताना काही लोक मी याला सांगितले, त्याने काम मंजूर केले, अशा अफवा पसरवत आहेत. विरोधक खोटे, नाटे सांगून कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जनतेला वस्तुस्थिती माहीत असल्याचे लंके म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe