Success Story: बरेच शेतकरी आता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड करत असून यामध्ये औषधी गुणधर्म किंवा औषधी पिकांची शेती मोठ्या प्रमाणावर करू लागले आहे. अशा पद्धतीची शेती करताना ती शास्त्रोक्त पद्धतीने आणि शक्य असल्यास सेंद्रिय पद्धतीने केली तर नक्कीच लाखो रुपयांची कमाई या शेतीतून मिळणे शक्य आहे. अनेक नवतरुण शेतकरी शेतीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा प्रयोग करत आहेत.
नोकरीची उपलब्धता पाहिली तर नोकरीच्या मागे न लागता घरची शेती असेल तर ती शास्त्रोक्त पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून जर शेती केली आणि त्या पद्धतीने पिकांची लागवड केली तर नक्कीच शेती ही मोठ्या प्रमाणावर परवडणारी होऊ शकते हे देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. असेच एका शेतकऱ्याने सरकारी इंजिनिअरची नोकरी सोडली व चक्क कोरफडीची शेती केली. ही शेती करत असताना ती प्रचंड प्रमाणात यशस्वी देखील करून दाखवली.
हरीश धनदेव कोरफड लागवडीतून झाले समृद्ध
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, राजस्थान येथील हरीश धनदेव हे सरकारी इंजिनियर होते. यावेळी त्यांची पोस्टिंग ही जैसलमेर नगर परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर होती.परंतु मनात काहीतरी वेगळे सुरू असल्यामुळे नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नव्हते. म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचे ठरवले व घरी येऊन कोरफड लागवड करून शेती करण्याचे निश्चित केले. ठरवल्याप्रमाणे त्यांनी नोकरीला रामराम ठोकला व गावी येऊन कोरफडीची शेती करायला सुरुवात केली.
या कोरफड शेतीसंबंधी माहिती देताना हरीश यांनी सांगितले की, दिल्ली या ठिकाणी एक कृषी प्रदर्शन होते व त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना नोकरी करण्याची इच्छा राहिली नाही व घरी येऊन शेती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व गावी परत येऊन 120 एकर जमिनीवर कोरफडीची लागवड केली. तसे पाहायला गेले तर राजस्थानमध्ये शेतकरी मका तसेच बाजरी आणि गहू अशा परंपरागत पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
परंतु हरीश यांनी शेती करताना औषधी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला व तो यशस्वी करून दाखवला. हरीश हे प्रामुख्याने बार्बी डेनिस या कोरफडीच्या जातीची लागवड करतात. विदेशात देखील या जातीच्या कोरफडीला खूप मागणी असल्यामुळे तसेच अनेक कॉस्मेटिक उत्पादनामध्ये देखील कच्चामाल म्हणून या जातीची कोरफड वापरली जाते. म्हणून त्यांनी कोरफड लागवड करताना बार्बी डेनिस या जातीची निवड केली.
वर्षाला दोन कोटीच्या पुढे कमाई
हरीश यांनी जैसलमेर जिल्ह्यामध्ये नॅचरल ऍग्रो नावाची एक स्वतः कंपनीची स्थापना केलेली आहे. तसेच त्यांनी कोरफड शेतीची सुरुवात करताना अगोदर 80 हजार रोपांची लागवड केली व आता काही लाख रोपांची त्यांनी लागवड केलेली आहे. हरीश धनदेव हे त्यांच्या शेतातील कोरफड पतंजली ग्रुपला सप्लाय करतात.
त्यामुळे त्यांच्या नॅचरल ऍग्रो या कंपनीला खूप मोठा फायदा होत आहे. तसेच कोरफडीच्या संदर्भात ते एक जागतिक ग्रुप देखील चालवत असून या माध्यमातून संपूर्ण जगात कोरफड निर्यात करणारे ते एक करोडपती शेतकरी ठरले आहेत. कोरफड शेतीच्या माध्यमातून त्यांचा वार्षिक टर्नओव्हर पाहिला तर तो दोन ते तीन कोटीच्या घरात आहे.