Fertilizer Tips :- शेतीमधील पिकांच्या अगोदरची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत तसेच कीड व रोग नियंत्रणाकरिता आवश्यक रासायनिक फवारण्या आणि शेवटी पिकांची काढणी करेपर्यंत अनेक प्रकारची कष्टाची कामे शेतकरी बंधूंना करावे लागतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या प्रकारची कामे करत असताना हातांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना हातदुखीची खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
तसेच आता या प्रकारच्या कामांसाठी अनेक यंत्र विकसित करण्यात आले असून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर करत आहेत. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला अशी यंत्रे विकत घेणे परवडतील असेही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून जुगाड करून शेती उपयोगी अनेक यंत्र विकसित करत असून त्याचा फायदा शेतीतील कामांमध्ये होताना दिसून येत आहे. यामध्ये रासायनिक खते पिकांना देताना आपण बऱ्याचदा ते फेकून देतो.
या कामांमध्ये बऱ्याचदा हातात बादली किंवा हातामध्ये पाटी घेऊन त्यामध्ये खत घेऊन ते फेकले जाते अशा पद्धतीचे हे काम असते. यामध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर हातात वेदना होण्याची शक्यता असते.याच अनुषंगाने खत अगदी आरामशीर पद्धतीने पिकांना फेकता यावे याकरिता एक जुगाड करून भन्नाट असे यंत्र विकसित केले आहे. तुम्ही सुद्धा जुगाड करून हे यंत्र सहजपणे बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये खर्च करण्याची देखील गरज नाही.
फक्त यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे पंखा फिरतो त्याप्रमाणे फिरणारे एखादं साहित्य असलं तरी तुमचे यंत्र तयार होऊ शकते. या यंत्र तयार करताना शेतकऱ्याने खत टाकण्यासाठी जुगाड म्हणून चौकोनी आकाराचा एक डब्बा घेतला आहे. म्हणजेच आपला फवारणीचा जो हातपंप असतो अगदी त्याच आकाराचा एक प्लास्टिकचा डबा त्याने घेतला असून त्याला एक पट्टा जोडला असून हा पट्टा तुम्ही तुमच्या गळ्यात घालून आरामात खत देऊ शकता.
या प्लास्टिक डब्याच्या खाली या शेतकऱ्याने जुगाड करून एक पंखा बसवला असून या प्लास्टिकच्या डब्यातून खाली खत पडावे याकरिता सोय केलेली आहे. त्यामुळे जेव्हा या डब्यातून खत पडते व पण जेव्हा तो पंखा फिरवला की खत शेतामध्ये ऑटोमॅटिक पसरून पडते. म्हणजेच तुम्हाला जास्त मेहनतीची गरज नसून तुम्ही वेळेत पूर्ण काम करू शकता.
जर आपण या जुगाड करून बनवलेल्या यंत्राचे फायदे पाहिले तर तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रात खत देऊ शकतात. तसेच जास्त मनुष्यबळाची गरज यामुळे भासणार नाही. एक व्यक्ती देखील हे काम आरामात करू शकतो. तसेच हे यंत्र वजनाने हलके असल्यामुळे त्याची ने आण करणे देखील सोपे आहे. तसेच यासाठी मजुरांची आवश्यकता नसते व वेळेची देखील खूप मोठी बचत होते.