माणसांमध्ये जर काही करण्याची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट आणि जिद्द असेल तर माणूस कुठल्याही प्रकारचा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या करू शकतो. फक्त आवश्यकता असते ती आपली मानसिक तयारीची. एखादा व्यवसाय करण्यासाठी मानसिक तयारी झाली की माणूस मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने त्या व्यवसायाच्या मागे लागतो आणि यश खेचून आणतो.
आता आपल्याला माहित आहे की भाकरी म्हटलं म्हणजे आपल्या समोर चटकन येते ते ज्वारी किंवा बाजरीची भाकर. परंतु या भाकर निर्मिती करून त्याचा स्वतःचा ब्रँड तयार करून चांगला व्यवसाय उभारता येतो हे जर कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु सातारा जिल्ह्यातील धामणेर येथील अमृता ताई मोरे यांनी ही किमया साधली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात पाहणार आहोत.

भाकर निर्मिती व्यवसायामध्ये केली प्रगती
सातारा जिल्ह्यात असलेल्या कोरेगाव तालुक्यातील धामणेर या गावचे अमृता मयूर मोरे यांनी बीएससी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे व त्यांचे पती हे पेंटर आहेत. त्यामुळे स्वतः देखील काहीतरी व्यवसाय करावा या उद्देशाने अमृता मोरे यांनी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला. शेती प्रक्रिया उद्योगाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यासंबंधीचे माहिती अनेक पेपर आणि इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली. तसेच सोलापूर येथील भाकरी बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मी बिराजदार यांच्याकडून पापड भाकर निर्मिती उद्योगाची माहिती मिळवली.
त्यांनी संपूर्ण कुटुंबाशी याबाबत चर्चा केली व या उद्योगाला सुरुवात करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मिळवला. त्यानंतर त्यांनी या व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी सोलापूर येथील या क्षेत्रातील उद्योजिका लक्ष्मीताई बिराजदार यांची भेट घेतली. या भेटीतून त्यांना कळून आले की भाकरीला स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतात व या व्यवसायाचा संपूर्ण अर्थशास्त्र त्यांनी समजून घेतले व व्यवसायाची सुरुवात करण्याचे ठरवले.
2021 मध्ये त्यांनी ओम साई महिला गृह उद्योग नावाने ज्वारी आणि बाजरी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. याकरिता घराच्या बाजूला छोट्या पत्राचा शेड तयार केला व परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करून ती घरगुती पातळीवर या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या गावामध्ये काही महिला वास्तव्याला होत्या व या चार महिलांना त्यांनी सोबत घेऊन भाकरी निर्मिती करण्यास सुरुवात केली. या भाकरीची जाहिरात त्यांनी स्थानिक एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शनामध्ये करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू या त्यांच्या पापड भाकरीला मागणी वाढली व त्यांचा उत्साह वाढीला लागला.
नंतर त्यांनी त्यांच्या पती व सासऱ्यांच्या मदतीने त्यांच्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या ढाबे व हॉटेल मालकांशी चर्चा केली व पापड भाकरीची माहिती त्यांना पुरवली. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून देखील या पापड भाकरीची खरेदी सुरू करण्यात आली. या माध्यमातून दररोज 400 भाकरीची मागणी सुरू झाली व स्थानिक पातळीवर त्यांनी गरम भाकर व पापड भाकर निर्मितीमध्ये संतुलन साधले व त्याप्रमाणे विक्रीचे नियोजन केले. या पद्धतीने हॉटेल मालकांची व ग्राहकांची मागणी असते त्यानुसार पापड भाकरी पॅकिंग करून दिली जाते. ज्वारीची गरम भाकरी 15 रुपये तर बाजरीची भाकरी आणि पापड भाकरी दहा रुपये या दराने विक्री केली जात आहे.
अशा पद्धतीने केली उद्योगात वाढ
सुरुवातीला दोन वर्ष त्यांनी चार महिलांच्या मदतीने भाकर निर्मिती करत होते, परंतु कालांतराने या भाकरींना मागणी वाढल्यामुळे त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करण्याचे निश्चित केले. त्याकरिता त्यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवले व या रकमेतून भाकरी बनवण्याचे स्वयंचलित यंत्र, पीठ मळणी यंत्र आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी केल्या. आता त्यांच्या व्यवसायाने तिसऱ्या वर्षात पदार्पण केले केले आहे व आता यांत्रिकीकरणाचा अवलंब केल्यामुळे कष्ट देखील कमी झाले व कमी वेळ जास्त भाकरी निर्मिती करायला सुरुवात करण्यात आली आहे.
या यंत्राच्या साह्याने एका दिवसात 1000 भाकरी तयार होतात. सध्या मागणीनुसार दररोज 500 भाकरी या हॉटेल व्यवसायिक व ग्राहकांना पुरवल्या जातात. या यंत्रामुळे आता मजुरांमध्ये देखील बचत झाली असून वेळेवर भाकरी पुरवठा करणे देखील शक्य झाले आहे. नऱ्या कालावधीमध्ये ते भाकरी व्यवसायासोबतच पापड निर्मितीचा व्यवसाय देखील सुरू करणार आहेत.