Success Story :- कधीकधी एखादी गोष्ट आपण सहजतेने सुरू करतो. परंतु कालांतराने ती सहजतेने सुरू केलेली गोष्ट किंवा व्यवसाय इतक्या प्रचंड प्रमाणात नावारूपाला येतो की आपला विश्वास बसत नाही. हा प्रवास सहज घडून न येता यामागे खूप मोठे नियोजन आणि कष्ट यांचा मिलाप आवश्यक असतो. आज भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर अनेक उत्पादनांचे लोकप्रिय असे ब्रँड असून थेट ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत आपसूकच एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत त्या त्या ब्रँडचे नाव आपल्या ओठावर येत असते.
अगदी अशीच गोष्ट पापडाच्या बाबतीत घडते. कधीही पापड म्हटले आणि आपण दुकानात पापड घ्यायला गेलो तर आपल्या तोंडावर आपसूकच लिज्जत पापड हे नाव येते. पण तो या क्षेत्रातील लिज्जत पापड हे नाव किंवा या ब्रँडच्या मागची कहाणी पाहिली तर ती खूप विस्मयकारक आणि संघर्ष युक्त अशी आहे.
लिज्जत पापडची सुरुवात कशी झाली?
गुजरात राज्यातील सात महिलांनी मोकळा वेळ असल्यामुळे वेळेचा सदुपयोग करावा या कारणाने सुरुवात झालेला हा व्यवसाय आज खूप यशाच्या उंचीवर पोहोचला. मुंबईमधील गिरगाव या ठिकाणी राहणाऱ्या जसवंती बेन, पार्वतीबेन रामदास थोडानी, बानूबेन तन्ना, लागूबेन, अमृतलाल गोकानी आणि जयाबेन विठलानी या सात जणी एकत्र आल्यावर दिवसभरातील मोकळ्या वेळेमध्ये काहीतरी काम करायचे हे निश्चित केले.
त्यानंतर कोणता व्यवसाय सुरू करावा हे त्यांच्या मनात सुरू झाले आणि त्यातूनच त्यांच्या डोक्यात आले की घराच्या गच्चीवर पापड बनवायचे व ते विक्री करायचे. ही त्यांच्या कल्पनेला त्यांनी पुरुषोत्तम दामोदर दत्तानी यांची साथ घेतली. सगळे मिळून घरून 80 रुपये उसने घेतले व उडीद डाळ, हिंग तसेच मसाले विकत घेतले व घराच्या गच्चीवरच पापड बनवायचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पापडाचे पाच पाकिटे बनवले व ते विकून फक्त 50 पैशांची कमाई त्यांना झाली.
परंतु ही घटना 1959 या वर्षीची असल्यामुळे या 50 पैशाचे मोल देखील तेव्हा खूप होते. त्यानंतर या सातही मैत्रिणींमध्ये उत्साह संचारला व त्यांनी हळूहळू नफा मिळवण्यामध्ये वाढ केली. एक रुपयापासून ते सहा हजार पर्यंत नफा त्यांनी वाढवला. परंतु यामध्ये जो काही त्यांना नफा आला तो नफ्याचा पैसा त्यांनी जाहिरात वगैरे गोष्टींवर खर्च न करता पापडाचा दर्जा कसा सुधारता येईल याकरिता खर्च केला. घराच्या गच्चीवर सुरू केलेला हा व्यवसायामध्ये हळूहळू माणसे वाढत गेली व त्यानंतर सहकारी संस्थेची त्यांनी नोंदणी केली. हीच महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्था लिज्जत पापड चे संपूर्ण व्यवस्थापन करते.
आज या उद्योगात 45 हजार महिला करत आहेत काम
आज या लिज्जत पापड मध्ये 45000 पेक्षा जास्त महिला या उद्योगांमध्ये काम करत असून जो तो आपली आपली भूमिका पार पाडत आहेत. या लिज्जत पापड संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व महिला एकमेकांना बहीण म्हणून संबोधतात. या ठिकाणी साडेचार वाजल्यापासून काम सुरू होते. आज लिज्जत पापडचा विस्तार पाहिला तर संपूर्ण देशामध्ये 60 पेक्षा अधिक केंद्रे असून त्या ठिकाणी पापडे बनवले जातात.
परंतु यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही केंद्रावर पापड बनला तरी त्याची चव सगळ्याच ठिकाणी सारखीच आहे. 2002 साली लिज्जत पापडने उत्तुंग भरारी घेत 300 अब्ज डॉलरची कमाई केली. यामध्ये 40 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून संपूर्ण देशात 62 विभाग आणि केंद्र देखील आहेत. 2022 मध्ये या संस्थेची एकूण संपत्ती पाहिली तर ती 1600 कोटी रुपयांच्या घरात होती. म्हणजे लिज्जत या ब्रँडच्या नावावर आतापर्यंत साडेपाच अब्ज पापड विकले गेले आहेत.