Ahmednagar News : अहमदनगर सध्या शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची धूम सुरु असून अनेक ठिकाणी गणेश मंडळांच्या माध्यमातून राजकीय चढाओढ सुरू असल्याने यातून वाद निर्माण होत आहेत.
पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून उत्सव काळात शांतता भंग केल्यास, वाद घातल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना थेट तडीपार करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिला आहे.
नगर शहरात गणेश मंडळांच्या मंडप उभारणीवरून चार ते पाच मंडळांमध्ये वाद झाले. यात एका ठिकाणी पोलिस प्रशासनाने कोणताही कार्यक्रम घेण्यास उत्सव सण साजरा करण्यास निर्बंध घातले आहेत.
इतर ठिकाणी तोडगा काढून वाद मिटवले. असे असले तरी राजकीय चढाओढीतून येथे कुरबुरी सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेश स्थापना मिरवणुकीत काही ठिकाणी तुरळक वाद झाले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून ते मिटवले.
तसेच पहिल्या दिवशी किरकोळ वाद झालेल्या, मिरवणुकीच्या माध्यमातून रस्ते अडवणाऱ्या गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शांतता भंग होईल, असे कृत्य केल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्याच दिवशी तडीपार केले जाईल, असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला आहे.