मराठवाड्याच्या अंबादासची जपानला भरारी! हलाखीत शिक्षण पूर्ण करून मिळवले 49 लाखाचे पॅकेज, वाचा यशोगाथा

Published on -

आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा पाहतो की मुलं मुली अत्यंत हुशार असतात परंतु घरची आर्थिक परिस्थिती खूप हलकीची असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून काम धंदा शोधावा लागतो. परंतु यामध्ये असे अनेक तरुण-तरुणी असतात की गरिबी कितीही राहिली तरी त्यांच्या आई-वडील पाठीशी खंबीरपणे उभे राहतात व मुलांना प्रोत्साहन देतात व अशी मुले खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दाखवतात.

या प्रकारचे उदाहरणे देखील आपल्याला समाजात बरेच बघायला मिळतात. तसे पाहायला गेले तर आपले ध्येय जर पक्के असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात कष्ट उपसण्याची तयारी असेल तर आर्थिक परिस्थिती कधीच आडवी येत नाही हे मात्र सत्य आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यातील परतुर शहरात राहणाऱ्या एका बांधकाम मजुराच्या  मुलाची यशोगाथा पाहिली तर ती तोंडात बोट घालायला लावील अशीच आहे. याच मुलाची यशोगाथा आपण बघणार आहोत.

 जालन्याच्या अंबादासने जपानमध्ये मिळवले 49 लाखाचे पॅकेज

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील परतुर या शहरात राहणारे  एका बांधकाम मजुराच्या मुलाने नामांकित तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई येथून रजत पदक मिळवले व या तरुणाचे नाव आहे अंबादास कडू म्हस्के हे होय. परतुर शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी भागामध्ये आपल्या भावंडासमवेत तो सध्या राहतो.

अंबादासने भाजीपाल्याचा क्रेट वर फळ्या टाकून त्याचा टेबल म्हणून वापर अभ्यासासाठी केला. अंबादासाचे आई-वडील हे बांधकाम मजूर म्हणून मुंबई येथे काम करतात. सध्या त्याने एम टेक तंत्रज्ञान आणि विकास या विषयांमध्ये चांगली कामगिरी केली व पदक पटकावले. नुकताच मुंबई आयआयटीच्या पदवीदान समारंभामध्ये त्याचा सन्मान करण्यात आला.

 अंबादासची शैक्षणिक पार्श्वभूमी

अंबादास मस्केची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर परतुर शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये दहावी व बारावी ही परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात पूर्ण झाली. आई वडिलांचा व्यवसाय हा बांधकाम मजूर असल्यामुळे ते ज्या ठिकाणी बांधकामाच्या साईट असेल त्या ठिकाणी जवळ असणाऱ्या सरकारी शाळेत अंबादास यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.

अंबादास च्या आई वडिलांची इच्छा होती की जे दारिद्र्य त्यांच्या नशिबी आलेले आहेत ते आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये या दृष्टिकोनातून  त्यांनी अंबादास तसेच त्याचा लहान भाऊ व बहिणींना शाळेमध्ये घातले. अंबादासाच्या आई-वडिलांना कामासाठी अनेक वेळा शहर बदलावे लागत होते. कामाचे ठिकाण बदलले की राहण्याचे ठिकाण देखील त्यांच्या बदलत असे व या गोष्टीचा परिणाम मुलांच्या शाळेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना परतूर या ठिकाणी आजी-आजोबांकडे पाठवले.

जेव्हा अंबादास आठवीमध्ये होता तेव्हा त्यांनी एन एम एम एस स्पर्धा परीक्षा दिली होती व तो जालना जिल्ह्यात दुसरा आला. या सगळ्या उलाढालीतून त्याला स्वतःच्या आतील गुणांची पारख झाली आणि त्याचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर त्याने आयएमओ, आयपीएन, एनएसओ, आयईओ, एनएसटीएसटीइ, एमटीएसई, जेटीएसई पाणी ओलंपियाड होमी भाभा अशा परीक्षा त्याने दिल्या व त्याला शिक्षकांच्या माध्यमातून देखील पुरेपूर मदत व मार्गदर्शन मिळाले. 2015 मध्ये तो दहावी उत्तीर्ण झाला व त्याला 92.20% गुण मिळाले व बारावीला 2017 मध्ये त्याला 85.84 गुण मिळाले.

त्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये नगररचना या विषयांमध्ये बीटेकला प्रवेश मिळाला. त्या ठिकाणी देखील जिद्दीने आणि कुठल्याही कोचिंग शिवाय त्याने आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी केली. तंत्रज्ञान आणि विकास अभ्यासक्रमासाठी आयआयटी मुंबई येथे त्याची निवड झाली. यामध्ये कमवा आणि शिका योजना तसेच राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना त्यासोबतच अलूमनी शिष्यवृत्ती याची त्याला खूप मोठी आर्थिक मदत शिक्षणामध्ये झाली.

अंबादास हा परिस्थितीमुळे किंवा पैसे नाहीत म्हणून रडत न बसता त्याने कष्ट चालू ठेवले व मशीन लर्निंग, जीआयएस तसेच स्टॅटिस्टिक्स हे अभ्यासक्रम पूर्ण केले. या सगळ्या माध्यमातून एक डिसेंबर 2022 रोजी त्याची कॅम्पस प्लेसमेंट मधून होंडा संशोधन आणि विकास कंपनीमध्ये डेटा विश्लेषक म्हणून निवड झाली व ऑगस्ट 2023 मध्ये त्याने रौप्य पदकासह आयआयटी पूर्ण केले व 29 सप्टेंबरला अंबादास आता जपानला नोकरीसाठी जाणार असून एक ऑक्टोबर पासून आपल्या नव्या नोकरीच्या ठिकाणी रुजू होणार आहे. अशाप्रकारे आर्थिक परिस्थिती आणि गरीबीमुळे रडत किंवा कुढत न बसता मोठ्या जिद्दीने जर प्रयत्न चालू ठेवले व अभ्यास केला तर उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येते हे अंबादासने दाखवून दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe