Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात पावसाचा कहर ! भात पिकांना धोका शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व परिसरात दरवर्षी साधरणता पाच ते सहा हजार मीमी पाऊस पडत असतो. त्यामुळे भंडारदरा पाणलोटासह परिसरात प्रामुख्याने भातपिक घेण्यावर भर दिला जातो

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा दुष्काळ असला तरी अकोले तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. यावर्षी पावसामध्ये सातत्य नसले तरी भातपिकांना पोषक असा पाऊस भंडारदरा पाणलोटात कोसळला आहे. त्यामुळे भंडारदऱ्याच्या आदिवासी भागात भातपिके जोमाने वाढु लागली आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने कहर केला असून जोरदार कोसळत असलेल्या पावसाने भात पिकांना धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

गत दहा दिवसांपासून भंडारदऱ्यासह अहमदनगर जिल्ह्यातही परतीच्या पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. हा पाऊस दीड ते दोन तासच जोरदार कोसळत असुन रात्रीच्या सुमारासही पाऊस पडत आहे.

आता आदिवासी बांधवांच्या भातपिकांना जास्त पाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. दिवसा पाऊस पडल्यास तो भातपिकांना तारणारा ठरत असून भात पिकांवरील फुलोरा धुऊन जाण्यास मदत होत आहे; मात्र रात्रीच्या कालावधीमध्ये पडणारा पाऊस आदिवासी बांधवांच्या भात पिकांना घातक असल्याचे मत आदिवासी बांधवांकडुन व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वेळेस भात पिके निसावत असुन भाताच्या लोमटीमध्ये पावसाचे पाणी गेल्यास येणारे भातपिक काळे पडते. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भातपिकांसाठी सध्या पडत असलेला पाऊस धोकादायक आहे.

शुक्रवारी भंडारदरा परिसरात दुपारी चार वाजता पडलेल्या पावसाने कहर केला. शेंडीच्या आठवडे बाजारावरही याचा परिणाम दिसुन आला. सुमारे दीड तास या पावसाने सर्वांना झोडपून काढले. तर रात्री आठ ते १० या कालावधीतही मुसळधार पाऊस पडला.

गेल्या २४ तासांत भंडारदरा येथे ४३ मीमी पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे ५७ मीमी पाऊस पडला. रतनवाडी ६७ मी.मी., पांजरे ३७ तर वाकी येथे २३ मीमी पाऊस पडला. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ११ हजार २६ दशलक्ष घनफूट असुन वाकी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरु करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe