वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला ! रुळावर रॉड आणि…

Ahmednagarlive24 office
Published:

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तार होत असतानाच राजस्थानमध्ये लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे सोमवारी वंदे भारतचा मोठा अपघात टळला आहे. उदयपूर- जयपूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघातग्रस्त करण्याच्या उद्देशाने रुळावर रॉड उभे करण्यात आले.

तसेच दगडांचा थर रचण्यात आला. संपूर्ण रेल्वे रुळावरून घसरेल, असा यामागे हेतू होता; परंतु ही बाब लोको पायलटच्या निदर्शनास आली व त्याने समयसूचकता दाखवत एक्स्प्रेस वेळीच थांबवली.

देशात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून या गाडीला अनेकदा अपघात झाला आहे. कधी म्हशी अचानक रुळावर आल्या, तर कधी इतर कारणांनी ही एक्स्प्रेस अपघाताची शिकार झाली.

आता राजस्थानातील उदयपूर ते जयपूर दरम्यानच्या वंदे भारतला निशाण्यावर ठेवून काही उपद्रवींनी चक्क रुळावरच रॉड उभे केले. यासोबतच दगडांचा थर रुळावर रचण्यात आला. चित्तौडगड जिल्ह्यातील सोनियाना गांगरार येथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वे रुळावर रॉड व दगड आणि इतर संशयास्पद गोष्टी दिसल्या.

त्यानंतर त्याने आपत्कालीन ब्रेक लावत तातडीने रेल्वे थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला व प्रवाशांचाही जीव वाचला. दरम्यान, रेल्वे रुळावर रॉड व दगड ठेवल्याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली.

त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रॉड व दगड दूर करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, रुळावर रॉड ठेवण्याचे षड्यंत्र कोणाचे होते, हे अद्यापही कळू शकलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe