Ahmednagar News : निळवंडे कालव्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत निळवंडे कृती समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत तात्काळ बैठक लावली जाईल,
असे आश्वासन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिल्यानंतर निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी राहुरी तालुक्यातील तांभेरे गावातील श्रीराम मंदिरात निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले असून परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांनी या उपोषणास पाठींबा दिला आहे.
निळवंडे धरणावर १८२ गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे, प्रस्तावित कालव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी दुर कराव्यात, डाव्या आणि उजव्या कालवे हे बंदिस्त ऐवजी उघड्या पद्धतीने कराव्यात अशी मागणी आदिसह अनेक मागण्यांसाठी दादासाहेब पवार यांनी गेल्या ४ दिवसापासून उपोषण सुरू केले होते.
अनेकांनी या उपोषणास पाठींबा दिला होता. दरम्यान गुरुवारी रात्री अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन हे उपोषण सोडण्यात आले आहे. यावेळी बोलताना आ. निलेश लंके म्हणाले की, निळवंडे कालवे प्रश्नी अनेक वर्षापासून शेतकरी संघर्ष करीत आहे.
शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा ही प्रामाणिक भावना असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकत्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविले आहे.मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार व फडणवीस यांच्या उपस्थितीत कृती समितीची मुंबईत बैठक लावणार असल्याचे सांगितले.
निळवंडेबाबत केवळ फ्लेक्सबाजी झाल्याचे दिसून आले मात्र प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे आ.लंके म्हणाले. शेतकऱ्यांसाठीचा हा लढा जिंकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा शब्द आ. लंके यांनी दिला.
निळवंडे कालव्याप्रश्नी तांभेरे येथील उपोषण कर्त्यांची शरद पवार गटाचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेऊन पाठींबा दिला. शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून निळवंडे कालव्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी करून लाभार्थी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारू असा इशारा दिला.