Inspirational Story:- बरेच तरुण तरुणींची जीवनाची सुरुवात ही असंख्य अडचणींनी होते. कुटुंबाचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागतो व वाटेल ते काम करून कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा याकरिता कामे करावे लागतात. यापैकी बऱ्याच तरुण-तरुणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असतात.
परंतु त्या कौशल्यांना व्यवस्थित संधी किंवा वाव न मिळाल्यामुळे ती दबून राहतात व वाटेल ते काम करून जीवनाचा प्रवास सुरू ठेवतात. परंतु जे काही ध्येयाने प्रेरित झालेले युवक असतात त्यांना त्यांच्या ध्येयाप्रती असणाऱ्या आसक्ती स्वस्थ बसू देत नाही व ते त्या दिशेने प्रयत्न करत राहतात.
असाच काहीसा प्रवास बिहारमधील दिलखुश कुमार यांचा होता. परंतु आज त्यांनी उभारलेल्या एका अनोख्या स्टार्टअपने आयटी आणि आयआयएम सारख्या संस्थेतून पदवीधर झालेल्या तरुणांना रोजगार पुरवला आहे. त्यांच्या या नवीन स्टार्टअप आणि त्यांचा एकूण जीवन प्रवास याविषयीची माहिती या लेखात घेऊ.
दिलखुश कुमार यांचा जीवनाचा संघर्ष आणि कुटुंबाची पार्श्वभूमी
दिलखुश कुमार हे बिहार राज्यातील मधुपुर या गावचे रहिवासी असून ते सध्या ऑनलाईन टॅक्सी प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ देखील आहेत. परंतु जर त्यांचा संघर्षाचा काळ पाहिला तर तो खूप कठीण असा असून त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला याबद्दलची कहाणीच एक प्रेरणादायी आहे.
आता घरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे शिक्षण त्यांना घेता आले नाही व फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले व ते देखील त्यांना अर्धवट सोडावे लागले. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा याकरिता त्यांनी रिक्षा चालवण्यापासून तर भाजीपाला विकण्यापर्यंतची अनेक छोटी मोठी कामे केली व कुटुंबाला आर्थिक आधार मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते. एकदा दिलखुश कुमार सिक्युरिटी गार्डच्या नोकरी करिता इंटरव्यू ला गेले असता त्यांना त्यांच्या कमी शिक्षणामुळे नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांनी नोकरी करिता दिल्ली गाठली. परंतु त्या ठिकाणी देखील नोकरी मिळवण्यासाठी खूप हेलपाटे खावे लागले आणि शेवटी अपयशाचा सामना करावा लागला. दिल्ली या ठिकाणी त्यांनी पेडल रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला व त्या पद्धतीने काम सुरू केले.
परंतु या ठिकाणी देखील दिलखुश यांना त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही. त्यामुळे काळजीपोटी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी परत बोलावून घेतले. त्यामुळे आता काय काम करावे या काळजीने असतानाच त्यांनी ठरवले की वडिलांकडून कार चालवायला शिकावे व त्या पद्धतीने त्यांनी कार चालवायला शिकण्यास सुरुवात केली. त्याच कालावधीमध्ये पाटणा या ठिकाणी फटाकांच्या कारखान्यामध्ये काम देखील केले व हे काम करत असताना मारुती 800 कार चालवण्याची नोकरी देखील त्यांना मिळाली.
अशी झाली रोडबेज या स्टार्टअप कंपनीचे सुरुवात
फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये कार चालवण्याची नोकरी मिळाल्यानंतर त्यांना रोडबेज नावाचा स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सुचली व त्याकरता त्यांनी सेकंड हॅन्ड नॅनो कार खरेदी केली व रोडबेज कंपनी सुरू केली. आज विचार केला तर बिहारमधील ही सर्वात मोठी कंपनी असून ती नागरिकांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित वन वे टॅक्सी सेवा पुरवते.
आता या कंपनीने फार मोठी भरारी घेतली असून या कंपनीच्या ज्या काही सेवा आहेत त्यांचा विस्तार बिहार राज्याच्या बाहेर करण्याची प्लॅनिंग दिलखुश कुमार यांची आहे. जर आपण या कंपनीत असलेल्या ड्रायव्हरला मिळणारा पगार पाहिला तर तो 55 ते 60000 रुपये प्रति महिना इतका आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या या कंपनीचे जे काही नेटवर्क आहे त्यामध्ये एकूण चारशे कार असून पाचशे लोकांना रोजगार पुरवण्याचे महत्त्वाचे काम या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे स्वतः बारावी पास असणाऱ्या या तरुणांनी आयआयटी आणि आयआयएम सारख्या मोठ्या संस्थामधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना काम दिले आहे.
रोडबेज या कंपनीने आयआयटी गुवाहाटी मधून पदवीधरांना नियुक्त केले असून अनेक आयआयएम सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी दिलखुश कुमारला स्वप्न साकार करण्यासाठी मदत करत आहेत.
या पद्धतीने आपल्याला दिलखुश कुमार यांच्या उदाहरणावरून दिसून येते की छोटीशी कल्पना सुचल्यानंतर ती कल्पना व्यवसायाच्या रूपात उतरवण्यासाठी अखंड मेहनत आणि जिद्द ठेवली तर फार मोठा व्यवसाय उभा राहू शकतो हे आपल्याला दिसून येते.