Shirdi News : श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व हेळसांड होत असून ती तात्काळ थांबवावी, असे निवेदन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाला दिले आहे.
वैद्यकीय संचालक यांच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात चौगुले यांनी म्हटले आहे, की हॉस्पिटलमधील काही विभाग सुरळीत सुरू असून काही विभागातील अडचणींमुळे रुग्णांना त्रासाला सामोर जावं लागत आहे. डायलिसिस विभागातील काही मशीन बंद असल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अनेक वेळा ताटकळत राहावे लागत आहे.
तर सोनोग्राफी विभागात सर्व सुविधा आहेत; परंतु डॉक्टर उपलब्ध नसल्याने सोनोग्राफी विभाग बंद आहे. यामुळे माफक दरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा खासगी सोनोग्राफी सेंटरला करावी लागते किंवा सीटी स्कॅन करावा लागतो, परिणामी रुग्णांना आर्थिक फटक्याबरोबरच मोठ्या प्रमाणात हेळसांड व गैरसोय होत आहे.
सोनोग्राफी केल्यास ३५९ रुपये लागतात. खासगी सेंटरला तीच रक्कम एक ते दीड हजार लागतात. हा आर्थिक फटका निष्कारण गरीब रुग्णांना सोसावा लागत आहे. या सुविधा तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा चौगुले यांनी दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश आरणे उपस्थित होते.