Ahmednagar News : मराठा आरक्षणावरुन राज्यभर रान पेटविणारे महायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत दागिने चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात आला आहे. अमोल बाबासाहेब गिते (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यास गजाआड करण्यात आले आहे.
आरोपीकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पाथर्डी, शेवगाव, आळंदी, नातेपुते (जि. सोलापूर) या पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
श्री. जरांगे पाटील यांची साकुरी येथील विरभद्र मंदिरासमोर टोलेजंग सभा झाली होती. या सभेत गर्दीचा फायदा घेत चोरट्याने फिर्यादी किशोर चांगदेव दंडवते यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरुन नेली होती तसेच सोन्याचे पेन्डलही लंपास केले.
एकूण १० लाख ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला होता. याबाबत किशोर दंडवते यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
सदरील गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरविला असता अमोल बाबासाहेब गिते याच्याकडे संशयाची सुई गेली. पोलिस तपासात सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
अमोल गिते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. नवीन माने (रा. भिंगार) व संदीप झिंजवडे (रा. पाथर्डी) या दोघांचा आरोपींमध्ये समावेश असून, ते पसार आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई.
सोपान गोरे, पोहेकॉ. बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय हिंगडे, दत्तात्रय गव्हाणे, पोना. रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, संतोष खैरे, संदीप चव्हाण, फुरकान शेख, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.