Soyabean Crop : श्रीरामपूर तालुक्यात सध्या सोंगणी मळणीयंत्रा मार्फत सोयाबीन पिकांची करून सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र यंदाही मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी पिकामध्ये ट्रॅक्टर घालून नांगरट केली आहे. परतीच्या पावसामुळे काही पिकांना थोडेफार जीवदान मिळाले आहे.
त्यांनी सोंगणी व काढणीचे काम हाती घेतले आहे. मात्र सोयाबीन पीक व त्यातील गवत पाहून व शेतकऱ्याची गरज ओळखून हे दर प्रति एकरी 3000 पासून 4500 हजार रुपयापर्यंत वाढले. सोयाबीन पीक चांगले आले तर एकरी सरासरी 13 ते 15 क्विटल पर्यंत उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी सरासरी उपादन प्रति एकरी 2 ते 5 क्विंटल मिळत आहे.
एकरी उत्पादन कमी झाल्यामुळे मळणी यंत्र मालकांनी प्रति पोत्या ऐवजी प्रतिएकरी दर आकारण्यास सुरुवात केली आहे. मळणी यंत्र चालक सोयाबीन तयार करण्यासाठी यापूर्वी 200 ते 250 रुपये घेत होते.
परिस्थिती बघून त्यांनी आता एकरात कितीही पोते उत्पादन झाले, तरी दर मात्र प्रति , एकरी 2500 ते 3000 पर्यंत आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकात 90 टक्के शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
परिसरात खरीप पीक पूर्णतः हातातून गेले आहे. तसेच यंदा अपुऱ्या पावसामुळे रब्बी पिकाची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हे वर्ष कसे पार पाडावे, याची चिंता सर्वांना सतावत असल्याची खंत शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.