Success Story : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचे शहर आहे असे म्हटले जाते. जिथे लोक दररोज वेगवेगळी स्वप्ने घेऊन येतात आणि ते पूर्ण करण्यात व्यस्त होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत,
जो 100 रुपये घेऊन मुंबईत आला आणि आज तो कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती सुपरस्टार किंग खानच्या शेजारी राहते आहे. सुभाष रुनवाल असं त्यांचं नाव आहे. मुंबईसारख्या शहरात सुभाष यांनी 100 रुपयांपासून करोडोपर्यंतचा प्रवास कसा केला हे आपण जाणून घेऊयात –
कोण आहेत सुभाष रुणवाल?
सुभाष रुनवाल हे ८० वर्षीय रिअल इस्टेट उद्योजक आहेत. ते मुंबईचे नावाजलेले डेव्हलपर आहेत. ते रुनवाल ग्रुपचे अध्यक्षही आहेत. परवडणाऱ्या घरांपासून ते लक्झरी आणि मॉल्सपर्यंत सर्व काही तयार करण्याचे काम त्यांची कंपनी करते. सामान्य वर्गापासून श्रीमंत वर्गापर्यंत प्रत्येकासाठी ते हे काम करतात.
वयाच्या २१ व्या वर्षी ते मुंबईत आले
त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी खूप संघर्ष केला. महाराष्ट्रातील धुलिया या छोट्याशा गावातून त्यांनी सुरुवात केली. लहानपणी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यानंतर ते पुण्यातून शिक्षण पूर्ण करून वयाच्या २१ व्या वर्षी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांच्याकडे फक्त १०० रुपये होते.
सीए झाल्यानंतर केली नोकरी
वयाच्या २१ व्या वर्षी मुंबईत आल्यावर त्यांनी अकाउंटंट होण्याचे स्वप्न पाहिले. ते सीए झाले आणि नंतर अमेरिकेतील Ernst & Ernst कंपनीत सीए म्हणून काम करू लागले, पण नंतर त्यांना कामात रस वाटेना. म्हणून ते नोकरी सोडून भारतात परतले.
ठाण्यात २२ एकर जमीन खरेदी
अमेरिकेतून पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत त्यांनी जो पैसा कमावला होता त्यातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. रिअल इस्टेट क्षेत्र सुरू करण्यासाठी त्यांनी ठाण्यात २२ एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला.
पहिला मॉल २००२ मध्ये बांधला
त्यानंतर त्यांनी येथे १० हजार चौरस फुटांमध्ये मोठी हाउसिंग सोसायटी उभारली. यानंतर सुभाष रुणवाल लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रसिद्ध झाले. २००२ मध्ये त्यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात पहिला मॉल बांधला. सुरुवातीला ते मुंबईतील वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी शाहरुख खानच्या बंगल्यासारखा आलिशान बंगला खरेदी केला आणि सध्या त्यांच्याकडे सुमारे ११,५०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.