Goat Rearing Scheme:- शेती आणि शेतीशी निगडित असणारे जोडधंदे यांचे खूप पूर्वापारचे नाते आहे. शेती सोबत पशुपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये गाय व म्हशींचे पालन दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून केले जाते. पशुपालना सोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन असे कितीतरी व्यवसाय आता पुढे येत आहेत.
यामधील शेळीपालन या व्यवसायाचा विचार केला तर कमीत कमी खर्च आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असल्यामुळे अनेक तरुण सुशिक्षित वर्ग आता शेळी पालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. शेळीपालन व्यवसाय आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या व्यवसायाला आता खूप चांगले दिवस आलेले आहेत.
त्यासोबतच शेळीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचे पाठबळ तर मिळतेच.परंतु बँकांकडून देखील कर्ज दिले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या स्वरूप आणि गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर शासनाकडून अनुदानाचा फायदा देखील तुम्हाला मिळवता येतो. शेळीपालनाकरिता नेमके कशा पद्धतीचे कर्ज उपलब्ध होते या संबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
नाबार्डच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध
नाबार्डच्या माध्यमातून देखील शेळीपालनाकरिता कर्ज देण्यात येते व अनुदानाचा लाभ देखील दिला जातो. नाबार्डच्या अंतर्गत शेळीपालनाकरिता अनुसूचित जाती/ जमाती आणि बीपीएल प्रवर्गातील लोकांना 50 टक्के सबसिडी मिळते व इतर प्रवर्गातील नागरिकांना 40% पर्यंत सबसिडीचा लाभ दिला जातो. नाबार्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे अनुदान याकरिता निश्चित करण्यात आले आहे.
नाबार्ड योजनेच्या माध्यमातून बँकांकडून कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते?
अनेक बँकांचा समावेश हा नाबार्ड योजनेअंतर्गत येतो व या माध्यमातून शेळीपालनाला प्रोत्साहन देण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. बँकांकडून कर्ज घेऊन तुम्ही शेळीपालनामधून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ सहजपणे घेऊ शकतात. नाबार्ड योजनेअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक, व्यावसायिक बँक तसेच नागरी बँक, ग्रामीण विकास बँक आणि राज्य सहकारी कृषी इत्यादी माध्यमातून तुम्हाला शेळी पालन करता कर्ज मिळते.
कोणत्या बाबींकरिता शेळीपालनासाठी कर्ज सुविधा मिळू शकते?
शेळ्यांची खरेदी तसेच त्यांना आहारासाठी लागणारा चारा आणि खाद्य तसेच शेळ्यांच्या निवाराकरिता लागणारे शेड बांधकामासाठी देखील तुम्हाला कर्ज मिळते.
बँका देतात दोन प्रकारचे कर्ज
बँकांच्या माध्यमातून शेळीपालनाकरिता दोन प्रकारचे कर्ज दिले जाते यातील पहिला प्रकार म्हणजे शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे शेळी पालन व्यवसायकरता आवश्यक खेळते भांडवल जे शेळीपालन व्यवसायासाठी महत्त्वाचे असते त्याकरिता कर्ज मिळते.
तुम्हाला कोणत्या प्रकारची गरज आहे त्यानुसार तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. शेळीपालनाकरिता वेगवेगळ्या बँका त्यांच्या निकषानुसार ग्राहकांना विहित नियमानुसार ठराविक रकमेचे कर्ज देत असतात. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर आयडीबीआय बँकेकडून शेळीपालन करिता 50 हजारापासून ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा मिळते.
शेळीपालनाकरिता कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
याकरिता अर्जदाराचे चार पासपोर्ट साईज फोटो, मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट तसेच पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बीपीएल कार्ड( उपलब्ध असल्यास ), जात प्रवर्गाकरिता जातीचे प्रमाणपत्र, वय अधीवास प्रमाणपत्र, शेळीपालन व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जमीन नोंदणी दस्तऐवज इत्यादी कागदपत्रे लागतात.
या योजने करता तुम्ही कुठे अर्ज करू शकतात?
शेळीपालन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जाऊन अर्ज घ्यावा लागतो व तो अर्ज भरताना तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित नमूद करावी लागते.