Pm Modi Visit Shirdi : उद्या (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डीत सभा आहे. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. याचवेळी शेतकऱ्यांना ‘नमो किसान’ योजनेतून पहिला हप्ता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत मोकळे जाल, पण येताना खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला असेल, असे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खा. विखे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली गेली. यावेळी ते बोलत होते.
विखे म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरु केली आहे.
एप्रिलमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार ‘पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती खा. विखे यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रातांधिकारी सायली साळुंखे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नेहमीच मराठा समाजासोबत…
मराठा आरक्षणाबाबत देखील खा. विखे यांनी भूमिका मंडळी. आपण मराठा आरक्षणासाठी नेहमीच समाजाबरोबरच असणार आहे. हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे असे ते म्हणाले.