Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरु असल्याने शेतकरी त्रस्त व नागरिक हतबल झाले आहेत.वारंवार खंडीत वीजपुरवठ्यामुळे विजेअभावी पिके जळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
विजेअभावी पाणीपुरवठा योजना प्रभावित होत असून, मोबाईट टॉवरच्या बॅटऱ्या पूर्णक्षमतेने चार्ज होत नसल्याने रेंज मिळत नाही. सण उत्सवाची धामधूम चालू असताना विजेच्या लपंडावाने नागरिक व शेतकरी त्रस्त असून, अखंडीत वीजपुरवठा करण्याची मागणी करत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात रब्बी ज्वारीची पेरणी केली आहे. मात्र, सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. विहिरीत व विंधन विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर तुषार सिंचन, ठिबक सिंचनाद्वारे ज्वारी पिकास पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे.
शेतकऱ्यांची धडपड सुरु असली तरी वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अडचण येत आहे. सध्या आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येतो. मात्र, त्यामध्येदेखील सतत वीज खंडीत होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही.
पाण्याअभावी कोवळी पिके करपून जाऊ लागली आहेत. जुन्या ट्रान्सफार्मवर वाढीव कनेक्शनचा भार वाढला आहे. बऱ्याचदा मोटर सुरु करून दाऱ्यावर जाईपर्यंत मागे लोड वाढल्याने फ्युज उडतो, त्यामुळे शेतकऱ्यांची फ्युज बसवायला पायपीट होते.
या सगळ्या पळापळीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विद्युत वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.