Maharashtra News : राज्य सरकारने राज्यातील सरसकट सर्व मराठा समाजाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राज्य सरकारने मागील ४० दिवसांच्या कालावधीत नेमके काय केले किंवा कोणत्या अडचणी आल्या हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाचे आंदोलन भरकटल्याच्या आरोपाचाही अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, हा विषय मार्गी लागत नसल्याने लोकांची सहनशीलता संपुष्टात येत आहे. मात्र सर्वांनी शांतता राखावी, अशी आमची विनंती आहे.
आरक्षण देण्यासाठी सरकार आणखी दोन महिन्यांचा वेळ मागत आहे. मात्र यापूर्वी दिलेल्या ४० दिवसांच्या कालावधीत सरकारने नेमके काय केले, ते महाराष्ट्राला कळले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे महाराष्ट्र आशेने पाहतो आहे. त्यामुळे त्यांनी तूर्तास उपोषण मागे घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.