Satbara Utara :- जमिनीचा व्यवहार किंवा जमिनीच्या बाबतीत जर सर्वात महत्त्वाचे कागदपत्र कोणते असेल तर ते म्हणजे सातबारा उतारा हा होय. सातबारा उतारा हा जमिनीचा आरसा असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कारण सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाविषयी किंवा त्या जमिनीची संपूर्ण कुंडलीच असते. परंतु कधीकधी बनावट किंवा बोगस सातबारा तयार करून किंवा असा सातबाराचा वापर करून अनेक बेकायदेशीर कामे देखील केले जातात.
बऱ्याचदा बँकेकडून बनावट सातबारा देऊन कर्ज देखील घेतले जाते किंवा जमिनीचे व्यवहार देखील घडवून आणण्याचे अनेक प्रकरणे आपण ऐकली किंवा वाचली असतील. अशी बरेच प्रकरणे महाराष्ट्रात घडून आलेले आहेत की बनावट सातबारा उतारे किंवा फेरफार आणि खोटा दस्तऐवज देऊन बँकेकडून लाखो रुपयांची कर्ज घेऊन बँकेची फसवणूक देखील करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने सातबारा उतारा पाहून जर तुम्हाला जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर अगोदर तो सातबारा खरा आहे की खोटा आहे हे पाहणे खूप गरजेचे आहे. मग तुमच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल की नेमका सातबारा खरा की खोटा हे कसे पहावे.
तर काळजी करण्याची गरज नसून या लेखामध्ये आपण अगदी साधे आणि सोपे उपाय बघणार आहोत ज्यायोगे तुम्ही सातबारा खरा की खोटा आहे हे चटकन तपासू शकणार आहात.
वापरा या पद्धती आणि ओळखा बनावट सातबारा
1- सातबारा वरची तलाठ्याची सही- सातबारा उताऱ्यावर तलाठ्याचे सही असते. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या जमिनीचा व्यवहार करत आहात त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बोगस असतो. परंतु आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे.
डिजिटल सातबाराच्या खालच्या बाजूला एक सूचना असते व ती म्हणजे या “सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची गरज नाही” अशा प्रकारचे सूचना जर तुमच्यासमोर आलेल्या सातबारावर नसेल तर तो बोगस सातबारा समजावा.
2- क्यूआर कोड- आता सातबारा उताऱ्यावर अनेक बदल करण्यात आलेले असून त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे उताऱ्यावर आता क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. तुमच्याकडे आलेला सातबारा उताऱ्यावर जर क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा बोगस आहे असे समजावे.
अशावेळी तुम्ही सातबारा उताऱ्याच्या प्रिंट वरती असलेला क्यूआर कोड स्कॅन केला तर तुम्हाला ओरिजनल सातबारा उतारा दिसतो. त्यामुळे किंवा क्यूआर कोड नसेल किंवा असेल तर तो स्कॅन करून तुम्ही सातबारा उतारा खरा आहे की खोटा आहे तपासू शकता.
3- एलजीडी कोड आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो- सातबारा उताऱ्यावर आता बरेच बदल करण्यात आलेले असून त्या बदलानुसार आता सातबारा उताऱ्यावर शेत जमिनीची माहिती असतेच परंतु संबंधित गावाचा एक युनिक कोड देखील नमूद केलेला असतो व हा कोड उताऱ्यावर गावाच्या नावासमोर कंसामध्ये असतो.
जर तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नसेल तर तो उतारा बोगस समजावा. याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ अ चा उताऱ्यावर वरच्या बाजूला इ महाभुमी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन यांचा लोगो टाकण्यास मान्यता दिलेली आहे.
परंतु डिजिटल सातबारा उताऱ्यावर जर हे दोन्ही प्रकारचे लोगो नसतील तर तो उतारा बोगस आहे असे समजावे. अशा पद्धतीने या तीन बाबींची पडताळणी करून तुम्ही सातबारा उतारा खरा आहे की खोटा याबद्दलची माहिती मिळवू शकता.