नुकतीच थंडी सुरू झाली असून आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जातो. हिवाळ्यात अनेकांची पचनक्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आहार तज्ज्ञांकडून पोषक आणि पौष्टिक आहाराचा सल्ला दिला जातो.
दरवर्षी हिवाळ्यात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते; मात्र यंदा पावसाअभावी बाजरीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे बाजरीचा भाव वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हिवाळ्यात बाजरीची भाकर खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. हिवाळ्यात आहारात बाजरीचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. बाजरी खाल्ल्याने आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहणे व अनेक आजार होण्याचा धोकाही टळतो.
बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे गहू व तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायक मानली जाते. बाजरीची भाकरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगितात. चपाती, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी हे आपण वर्षभर खातच असतो; परंतु हिवाळ्यात बाजरी आवर्जून खाल्ली जाते.
नुकतीच थंडीची चाहूल लागली आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम पचनशक्तीवर होतो. हिवाळ्यात पोषक आहाराने शरीर उबदार ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ बाजरी, ज्वारी खाण्याचा सल्ला देतात. हाटेल, ढाबा व खानावळीत मटण-भाकरीवर अनेक जण ताव मारतात. ग्रामीण भागात कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार मानला जातो.
बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बाजरी मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचा चांगला स्रोत आहे.
त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. बाजरी आणि ज्वारी ही सर्व ऋतूंत सहज उपलब्ध होते.
सध्या हॉटेल, ढाबा किंवा खानावळीत २० ते २५ रुपयांना बाजरीची तर २५ ते ३० रुपयांना ज्वारीची भाकरी मिळते. थंडीच्या दिवसांत दरवर्षी बाजरीच्या भाकरीला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याचे श्रीरामपूरातील अमर हॉटेलचे संचालक अजय गुप्ता यांनी सांगितले.
हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे
हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बाजरीत भरपूर फायबर असल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. ‘ब’ जीवनसत्त्व शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्येष्ठांसाठी बाजरीची भाकरी ही अधिक पोषक असते.
बाजरी हे लो कॅलरी डाएट मानले जाते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनाही बाजरीची भाकरी चालू शकते.