Agricultural News : सध्याच्या परिस्थितीत रब्बी पिकांना पाणी देणे गरजेचे असताना कृषिपंपांना केला जाणारा अनियमित विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला, परिणामी मूग पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकाकडे कल आहे.
मुळात रब्बी पिकांना पाणी देताना विहिरीतील अपुरे पाणी ही मोठी समस्या असताना कृषिपंपांना वीज भारनियमन व अनियमित वीज पुरवठयामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खरीप हंगामात पिकांचे समाधानकारक उत्पादन न झाल्याने रब्बी हंगामातील पिकांतून भरघोस उत्पादन होईल, अशी आशा बळीराजाला आहे; परंतु खंडीत वीज पुरवठा त्रासदायक ठरत असल्याने रब्बी हंगामही धोक्यात आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून, भारनियमनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो तर कधी उच्च तसेच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना रात्रभर पिकांना पाणीदेण्यासाठी जीव मुठीत धरुन शेतात जागरण करण्याचा प्रसंग येत आहे.
त्यामुळे वीज वितरणने शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्येबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूणच अस्मानी संकटाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे.
या गंभीर बाबीकडे वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी वैतागले असून, पिके जगविण्याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्याची व अखंडीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.