राज्यात यंदा पाऊस जेमतेम बसरला. अनेक ठिकाणी सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला. परंतु यात शेवगाव-पाथर्डी यांचा समावेश नाही. त्यामुळे येथील लोक संतप्त झाले आहेत.
पाथर्डी-शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकात सर्वपक्षीयांतर्फे गोकुळ दौंड यांनी बुधवारपासून (२२ नोव्हेंबर) उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांना शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी देखील पाठिंबा दिला. ते यावेळी म्हणाले,
सभापती डॉ. क्षितीज घुले यांचा सरकारला इशारा
सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी उपोषणस्थळावरून घणाघात केला. ते म्हणाले. कोरडगाव परिसराने निवडणुकीत तुम्हाला बळ दिले, तोच परिसर दुष्काळी यादीत बसत नाही. ज्यांनी तुम्हाला तारले, त्यांनाच विसरले आहेत. दौंड यांचे उपोषण सर्वांसाठी असून त्यांचा आवाज मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही, तुम्ही सर्वानी पाठिंबा देण्याची गरज आहे. याची दखल घेत दुष्काळ जाहीर झाला तर ठीक अन्यथा मंत्रालयाच्या दारात येऊन बसू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा नडला
लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच शेवगाव-पाथर्डीत दुष्काळ जाहीर झाला नाही. राज्यात व केंद्रात भाजप सरकार आहे, तरीही अडचण का यावी? असा सवाल करत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सर्व घटकांचा पाठिंबा
गोकुळ दौंड यांनी सुरु केलेल्या उपोषणाला शेतकरी संघटना, भाजपा ओबीसी सेल, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, सकल मराठा समाज व शेतकऱ्यांनीही यात सहभाग घेत पाठिंबा दिला. रामकिसन शिरसाट, स्वाभीमानीचे बाळासाहेब गजें, कचरे पाटील, सकल मराठा समाजाचे सोमनाथ बोरुडे, बबलू वावरे, राष्ट्रवादीचे शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कुसळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नेमाने, आम आदमीचे किसन आव्हाड, शिवसेनेचे नवनाथ उगलमोगले आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान दुष्काळ जाहीर करेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा दौंड यांनी दिला आहे.