चीनमध्ये न्युमोनियासारखी लक्षणे असलेला रहस्यमयी श्वसन विकार अत्यंत वेगाने पसरत आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा वेगाने संसर्ग होत असून, राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमध्ये रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत.
शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या वैद्यकीय स्थितीबाबत चिंता व्यक्त करत, चीनकडे या आजाराबाबत सविस्तर माहिती मागवली आहे.
उत्तर चीनमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रकोप आहे. फुफ्फुसांमध्ये दाह, ताप, खोकला, सर्दी, अशी या आजाराची लक्षणे आहेत. रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. या रहस्यमयी आजाराचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे.
बीजिंग, लियाओनिंगसह अनेक शहरांमधील बाल रुग्णालये आजारी मुलांनी भरून गेली आहेत. नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यास खाटा शिल्लक नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत; परंतु चीनने अद्याप या आजाराबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या रुग्णवाढीवर चिंता व्यक्त करत, श्वसनाशी संबंधित या अज्ञात आजाराबद्दल माहिती देण्याची विनंती केली आहे. हा रहस्यमयी आजार म्हणजे नव्या जागतिक महामारीचे संकेत नाहीत, असे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे;
परंतु यापूर्वी सार्स आणि कोविड-१९ आजाराची सुरुवात देखील अशाच प्रकारच्या अज्ञात न्युमोनियाने झाली होती. त्यामुळे आरोग्य संघटना वेळीच सावध झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने १३ नोव्हेंबर रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून कोरोना निर्बंध प्रो-मेड नामक एका सर्विलास प्लॅटफॉर्मने या रहस्यमयी न्युमोनियाबद्दल इशारा दिला आहे.
प्राणी आणि मानवात पसरणाऱ्या आजारांबद्दल या संकेतस्थळावर माहिती देण्यात येते. प्रो-मेडने यापूर्वी कोरोनाबद्दल देखील डिसेंबर २०१९ मध्ये एक इशारा दिला होता. या रहस्यमयी न्युमोनियाचा कोरोना महामारीप्रमाणे उद्रेक होऊ शकतो, असे प्रो-मेडचे म्हणणे आहे.
यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये देखील अशाच प्रकारे रुग्णवाढ झाली होती. १५ ऑक्टोबरनंतर इन्पलुएंजासारख्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा देण्यात आला होता.