Shirdi News : फक्त दहा दिवसांत साईबाबांच्या दानपेटीत साडेसतरा कोटींचे दान !

Ahmednagarlive24 office
Published:
Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दीपावली सुट्टीत मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली. या कालावधीत दानपेटीतही भाविकांनी भरभरून दान टाकले आहे.

दीपावलीच्या सुट्टीत १० दिवसांत श्री साईबाबांच्या दानेपटीत सुमारे १७ कोटी ५० लाख ५६ हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली.

श्री साईबाबांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य जगभरात वेगाने होत असून शिर्डी तीर्थक्षेत्र देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जात आहे. जगभरातील करोडो भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले आहे.

आजमितीला साईबाबा संस्थानकडे हजारो कोटींच्या ठेवी तसेच शेकडो किलो सोने व चांदी आहे. यासह स्थावर मालमत्तेचेही दान प्राप्त आहे. येथील श्री साईबाबांच्या दीपावली उत्सवानिमित्त जगभरातील लाखो भाविक साईचरणी नतमस्तक झाले असून

यंदाच्या वर्षी दीपावलीच्या सुट्टीत दि. १० ते २० नोव्हेंबर २०२३ या १० दिवसांत साईबाबांच्या झोळीत सोन्या चांदीसह कोट्यवधी रुपयांचे घसघशीत दान जमा झाले आहे. यामध्ये रोख स्वरूपात दक्षिणा पेटीत सुमारे ७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ रुपये जमा झाले,

तर देणगी काउंटरवर ३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर. ओ. सशुल्क पास विक्री माध्यमातून २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६०० रुपये चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगीतून ३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३ रुपये,

२२ लाख ६७ हजार १८९ रुपयांचे ४२५.८१० ग्रॅम सोने, तसेच ४ लाख ४९ हजार ७३२ रुपयांची ८२११.२०० ग्रॅम चांदी यांचा समावेश असून असे एकूण १७ कोटी ५० लाख ५६ हजार ८६ रुपयांचा समावेश असल्याचे पी शिवा शंकर यांनी सांगितले.

या उत्सवादरम्यान सुमारे ६ लाखांहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. त्याचबरोबर विविध देशांतील परदेशी भाविकदेखील साईचरणी नतमस्तक झाल्याचे पहावयास मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe