अचानक भरून आलेले आभाळ, सोसाट्याचा वारा, अचानक कोसळू लागलेल्या धारा आणि काही क्षणातच…

Maharashtra News : अचानक भरून आलेले आभाळ, सोसाट्याचा वारा, अचानक कोसळू लागलेल्या धारा आणि काही क्षणातच झालेला गारांचा मारा.. असे हिवाळी पावसाळ्याचे चित्र राज्यात रविवारी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले.

राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे दाणादाण उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. नाशिकमधील द्राक्ष बागांची, कांद्याची मोठी हानी झाली.

मुंबईतील सार्वजनिक सभांमध्येही या पावसाने विघ्न आणले. २६/११ च्या शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमातही त्यामुळे विघ्न आले.

मुंबईप्रमाणेच नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर या भागांत रविवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान, आज उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात नाशिक शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दाखल झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, कांद्यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान केले. दुष्काळाचे गडद ढंग डोक्यावर असताना अवकाळीसह झालेल्या गारपिटीने व जोरदार वाऱ्यामुळे शेतकरी आता पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे.

शेतात काम करताना अंगावर वीज पडून आणि गारांचा मार लागून दोन शेतकरी दगावले, तसेच एक म्हेस व बैलाचाही वीज पडून मृत्यू झाला असून, अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळीचा फटका निर्यात होणाऱ्या अर्ली द्राक्षांना बसला असून, द्राक्षपंढरीही संकटात सापडली आहे.

नाशिकमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली

हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बागलाण, सुरगाणा, निफाड, सिन्नर तालुक्यांत जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.