Agricultural News : श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात पशुधनासाठी मागील काही वर्षापासून मका पिकाची लागवड वाढत आहे. त्यात यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने चारा टंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उन्हाळ्यातील चारा नियोजनासाठी अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत मका लागवड केली आहे. परंतु मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप दिसत आहे. परिणामी, अळीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या घ्याव्या, लागत असल्याने चारा पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे.
मागील दोन वर्षापासून बाजारात मक्याला चांगले दर आहेत. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण दुबत्या जणावरांसाठी सकस चारा व धान्यासाठी अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले होते.
परंतु यंदा पाण्याअभावी मका लागवड कमी झालेली आहे. थंडीच्या हंगामात सध्याचे दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मका लागवड केली आहे. परंतु ढगाळ हवामामुळे मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी परिसरातील शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी दोन फवारण्या घेतल्या आहेत. परंतु, अद्याप प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही. मक्यावरील अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ कमी होते.
परिणामी, या काळात पिकाची होणारी निसवण व कापणीदेखील वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी त्यात संप्रेरके व अन्नद्रव्ये आदींची फवारणीदेखील घेत आहेत. यामुळे उत्पादन खर्च देखील वाढतच जात आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील ६०० हेक्टरवरील मकावर अळीचा प्रकोप दिसत आहे. काही मका वाण अळीला प्रतिकारक्षम असल्याची बतावणी बियाणे विक्रेते व इतर प्रतिनिधी करतात. परंतु सर्वच वाणांवर अळीचा प्रकोप दिसत आहे.
अळीच्या प्रादुर्भाव पानांवर दिसून येत आहे. अळी पानाला छिद्रे पाडते, तसेच पोंग्याची कुठलीही वाढ होत नाही. सध्या ढगाळ वातावरण आणि थंडीचे अल्प असलेले प्रमाण, यामुळे अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल हवामान स्थिती तयार झाली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
अळीसंबंधी कृषी विभाग फक्त सर्वेक्षण व आवाहन करीत आहे. मात्र त्यापुढे कोणतीही कार्यवाही केली जात नाही. या समस्येला नैसर्गिक आपत्ती घोषीत करून त्याबाबत पंचनामे, नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च येत आहे. लष्करी अळीमुळे मका पिकाचे सुरवातीच्या टप्प्यामध्येच १५ ते २० टक्के नुकसान झाले आहे. फवारणी वेळेत न घेतल्यास नुकसानीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कीड नियंत्रणासाठीच्या फवारणीसह संप्रेरके, अन्नद्रव्यांवरील खर्चामुळे चारा उत्पादनावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे युवा शेतकरी कृष्णा आबक यांनी सांगितले.
यंदाच्या रब्बी हंगामात श्रीरामपूर कृषी उपविभागातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी व शेवगाव चार तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड झालेली आहे.
तर एकट्या श्रीरामपूर तालुक्यात आत्तापर्यत सुमारे २ ते अडीच हजार हेक्टरवर मका लागवड करण्यात आली आहे. चाऱ्याच्या मागणीनुसार मका क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी व्यक्त केली आहे.