Ahmednagar News : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण योग्य पद्धतीने मिळावे यासाठी शासन विविध उपक्रम, योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी अनेक शाळांमध्ये डिजिटल संसाधन देखील उपलब्ध करून देण्यात आले.
आता जिल्हा परिषदेच्या16 शाळा सौर उर्जायुक्त होणार आहेत. या सौर ऊर्जेच्या आधारे विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. सौर पॅनेलसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने माहिती मागवली आहे. त्यात शाळांचे सद्यस्थिती वर्ग खोल्यांची माहिती दिली जाणार आहे.

* सोळा मॉडेल स्कूल
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील १६ आदर्श शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून मॉडेल स्कूल उभारण्यात येणार आहे. या योजनेतून शाळांवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. यासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाईल. सौर ऊर्जा पॅनल बसवल्यानंतर शाळेला विजेच्या असुविधेची कधी समस्या येणार नाही. त्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होईल.
* योजना राबवणाऱ्या सोळा शाळा
विरगाव, कळस (अकोले), उक्कलगाव (श्रीरामपूर), गोल्हारवाडी (राहता), पिंपरी लौकी (संगमनेर), हंगेवाडी (श्रीगोंदे), रेहकुरी (कर्जत), देवदैठण (जामखेड), मिडसांगवी (पाथर्डी), धोत्रे (कोपरगाव), बालमटाकळी (शेवगाव), खुपटी (नेवासे), हंगा (पारनेर), कोंढवड (राहुरी), रेणुकानगर, भोरवाडी (नगर)
किती खर्च अपेक्षित
शाळांना सौरऊर्जा प्रकल्प युक्त करण्यासाठी साधारण कोटभर रुपये लागतील. अंदाजानुसार जर पाहिलं तर एका शाळेसाठी सुमारे ७ लाख ५० हजार खर्च अपेक्षित आहे. या सर्वशाळांसाठी साधारण १ कोटी २० लाखांचा खर्च होईल असा अंदाज आहे.