Radhakrishna Vikhe Patil : मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याच्या सूचना
आपण प्रशासनास दिल्या असून आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले असल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच मदत करण्याबाबत प्रशासनास सांगितले असून, या नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा समोर येण्यास अवधी लागेल. परंतू महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यात १०० जनावरे जखमी आणि चार घरांची पडझड झाली असून, संगमनेर तालुक्यात ४ मेंढ्या मयत झाल्या असून, १० घरांची पडझड झाली आहे.
राहुरी तालुक्यात १२ कोकरू ६ मेंढ्या व १ शेळी मयत झाली ७ घरांची पडझड झाली असून, अकोले कोपरगाव श्रीरामपूर या तालुक्यातही घरांची पडझड व जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी अधिकर्या समवेत पाहाणी दौरा करणार असून, सद्य परीस्थीतीत स्थानिक अधिकाऱ्यांनी नूकसान झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.