Maharashtra News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गुरुवारी अर्थात उद्या दि.३० रोजी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्या शनिशिंगणापूर येथे शनी देवांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे.
परंतु शनी शिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाचे राष्ट्रपती शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरमध्ये येतायेत. राष्ट्रपती आरती, अभिषेक, दर्शन व महाप्रसादही घेणार आहेत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-11-29T090541.286.jpg)
* या दिग्गजांनी देखील घेतले आहे दर्शन
शनी देवांचा महिमा अगाध आहे. शनिचरणी लाखो भाविक नतमस्तक होत असतात. आता पर्यंत राजकीय दृष्ट्या पाहिले तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौड़ा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील दर्शनाला आले होते. परंतु कोविंद हे राज्यपाल असताना शिंगणापूरला आले होते. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. अनेक दिग्गज नेते मंडळी, अभिनेते शनी चरणी नतमस्तक होत असतात.
* असा असेल राष्ट्रपतींचा शनिदर्शन दौरा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी १२.१५ वाजता शिंगणापूरला आगमन होईल. त्यानंतर त्या १२.१५ ते १२. ३५ या वेळेत शनिदेव उदासी महाराज सभामंडपात अभिषेक करतील. त्यानंतर १२.३५ ते १२.४० यावेळेत चौथऱ्यावर शनिदेवास तेल अभिषेक झाला की मग १२.५० ते १.२५ महाप्रसादाचे आयोजन होईल. यावेळी देवस्थानकडून शनिदेव चौथऱ्यासमोर शनिदेव प्रतिमा, शाल व शनिप्रसाद देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला जाईल.
* चौथऱ्यावर महिलांना संधी
शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी होती. परंतु मध्यंतरी हा मुद्दा गाजला. आंदोलने झाली. त्यानंतर महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे आता शनी चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपती दर्शन घेतील.
* ड्रोन कॅमेरा बंदी
या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रपती असे पर्यंत याचा वापर करू नये असे आदेशित करण्यात आले आहे.