Cibil Score Growth Tips:- जीवनामध्ये प्रत्येकाला कर्जासाठी बँकेची पायरी चढावी लागते. गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन इत्यादीसाठी आपल्याला बँकेत जावेच लागते. जेव्हा आपण कर्जाच्या मागणीसाठी बँकेत जातो तेव्हा सर्वात प्रथम बँक आपला क्रेडिट स्कोर तपासत असते.
जर तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर चांगला असेल तर बँक तुम्हाला ताबडतोब कर्ज मंजूर करते. आपल्याला माहित आहेस की सिबिल स्कोर हा 300 ते 900 या अंकांच्या दरम्यान मोजला जातो. क्रेडिट रेटिंग वरून बँकांना अंदाज येतो की संबंधित कर्ज मागणारी किंवा घेणारी व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही.

त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर जितका चांगला असेल तितके तुम्हाला ताबडतोब कर्ज बँकांकडून मिळणे शक्य होते. एवढेच नाही तर तुम्हाला ते परवडणारे अशा व्याजदरांमध्ये देखील मिळते. साधारणपणे 750 च्या वर जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर तो कर्ज घेण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत खूप उत्तम मानला जातो.
परंतु काही कारणांमुळे किंवा काही चुकांमुळे आपला सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात घसरलेला असतो किंवा खराब झालेला असतो. त्यामुळे त्याला सुधारणे खूप गरजेचे असते. तुम्हाला जर तुमचा खराब झालेला सिबिल स्कोर सुधारायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काही चुकांची दुरुस्ती किंवा काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे व त्याविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
सिबिल स्कोर सुधारायचा असेल तर या गोष्टी पाळा
1- वेळेवर कर्जाचे हप्ते भरणे- जर तुम्ही याआधी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे प्रत्येक महिन्याच्या हप्ते तुम्ही वेळेवर भरणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तसे केले नसेल तर तुम्हाला ते हप्ते वेळेवर भरणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही तर त्याचा खूप विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होत असतो. तसेच तुमचा कोणताही हप्ता किंवा ईएमआय वगळला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटचा पर्याय निवडू शकतात. यामुळे एमआयच्या तारखेला तुमची रक्कम आपोआप डेबिट होते.
2- असुरक्षित कर्ज घेणे टाळावे- असुरक्षित कर्ज म्हणजे अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी अथवा तारण देण्याची गरज नसते. त्यामुळे दोन पेक्षा जास्त असुरक्षित प्रकारचे कर्ज कधीही घेऊ नये. त्यामुळे देखील तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला खूपच गरज आहे किंवा तुमच्या पुढे आता कोणताही पर्याय शिल्लक नाही तेव्हाच तुम्ही असुरक्षित प्रकारच्या कर्जाचा पर्याय निवडावा व त्याची परतफेड देखील वेळेवरच करावी.
3- एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नये- बरेच जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेऊन ठेवतात व त्यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर खराब होण्याची शक्यता वाढते. जास्त कर्ज घेतले गेले तर बरेच ईएमआय आपल्याला भरण्याची वेळ येते व अशावेळी परतफेड करणे देखील आपल्याला शक्य होत नाही. यामुळे नक्कीच तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. याकरिता एकावेळी अनेक कर्ज न घेतलेले बरे.
4- एखाद्याला कर्जासाठी गॅरेंटर अर्थात जामीनदार होण्यासाठी विचार करा- जर तुम्हाला एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल किंवा संयुक्त खातेदार व्हायचे असेल तर या अगोदर दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही ज्याच्यासोबत संयुक्त खातेदार किंवा कर्जदार आहात किंवा ज्याच्या कर्जासाठी तुम्ही जामीनदार झाला आहात आणि त्याने जर कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर देखील होतो व सिबिल स्कोर घसरतो.
5- क्रेडिट कार्डचा जास्त वापर टाळावा- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट कार्डवर जास्त खर्च केला तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या सिबिल स्कोर वर होत असतो. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वरचे संपूर्ण लिमिट संपवले तर तुम्ही कर्जबाजारी आहात असे त्या माध्यमातून दर्शवले जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्ड वर जो लिमिट दिलेला आहे त्यापैकी फक्त 30 टक्केच खर्च करणे महत्त्वाचे असते.
6- कर्ज घेऊन सिबिल स्कोर वाढवणे- या अगोदर तुम्ही कधीही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल तर तुमचा सिबिल स्कोर हा मायनस असतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही कर्ज मागायला गेलात तर तुम्ही कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहात किंवा विश्वासार्ह आहात याची कुठलीही शक्यता बँकांना समजत नाही. त्यामुळे बँक कर्ज द्यायला टाळाटाळ करू शकतात. अशा मध्ये तुम्ही क्रेडिट स्कोर वाढवण्याकरिता बँकेकडून क्रेडिट कार्ड घेऊ शकतात व ते वापरू शकतात व त्याचे पेमेंट वेळेवर केले तर तुमचे कर्ज बँकिंग प्रणालीमध्ये सुरू होते व तुमचा सिबिल स्कोर दोन ते तीन आठवड्यामध्ये अपडेट होतो. तसेच दुसरा मार्ग म्हणजे जर तुम्ही दहा हजार रुपयांच्या दोन छोट्या एफडी बँकेमध्ये केल्या व एफडी उघडल्यानंतर त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा अंतर्गत कर्ज घ्यावे. असे केल्यामुळे तुमचे बँकिंग प्रणाली मध्ये कर्ज सुरू होते व तुमचा मायनस क्रेडिट स्कोर लवकर वाढतो.