आपल्याकडे विविध समस्या आहेत. यात शासकीय कार्यालयांची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था आदी प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. शनी शिंगणापूर येथील स्थिती यापेक्षा काही वेगळी नव्हती. भाविकांची प्रचंड वर्दळ असली तरी रस्त्याची,शासकीय कार्यालयांची दुरवस्था ही होतीच. परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा परवा शनी दौरा झाला. अन या सगळ्या दुरवस्थांची साडेसाती मिटली. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे देवस्थान परिसर, सर्व रस्ते, अतिथीगृह, जनसंपर्क कार्यालय, प्रवेशद्वार यांनी टाकलेली कात भाविकांना सुखदायी ठरत आहे.
परिसराने टाकली कात
राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौऱ्यापूर्वीच शिंगणापूर देवस्थानकडून अतिथीगृह व जनसंपर्क कार्यालय चकाचक करण्यात आले. काही नव्याने फर्निचर, आकर्षक पडदे, रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे सगळीकडे स्वछता व टापटीपपणा निर्माण झाला आहे. देवस्थानचा संपूर्ण परिसर आकर्षक करण्यात आला.
शिंगणापुरात शनी देवस्थान प्रवेशद्वाराजवळ भाविकांचे आगमन होताच धुळीच्या लोटांचा भाविकांना त्रास होत असे. तेथेही पेव्हर ब्लॉक, नव्याने डांबरीकरण झाल्याने धुळीच्या लोटातून भाविकांची सुटका एकंदरीतच परिसराने कात टाकली असून परिसराची ‘साडेसाती’ हटली असे लोक म्हणत आहेत.
पोलिसांसह देवस्थानचे जबरदस्त नियोजन
राष्ट्रपती दौऱ्यादरम्यान पोलिसांसह देवस्थानचे नियोजन सर्वानाच भावले. अगदी योग्य व सुंदर नियोजन करण्यात आले होते. नगर-संभाजीनगर मार्गावरील वाहने, प्रवासी यांची राष्ट्रपती दौऱ्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी पोलिस यंत्रणेने घेतली होती.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व खैरे, उपअधीक्षक संदीप मिटके, सुनील पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीही या दौऱ्यात खूपच छान असे नियोजन केल्याने अनेकांच्या गैरसोयी टळल्या होत्या.
या सोबतच शनिशिंगणापूर देवस्थानने देखील व्यवस्थित नियोजन केले. विश्वस्त मंडळाने यासाठी विशेष मेहनत घेतली. देवस्थानकडून राष्ट्रपती दौऱ्याचे उत्कृष्ट व चोख नियोजन केले होते. सध्या भाविकांमधून पोलीस यंत्रणा व देवस्थानचे कौतुक केले जात आहे.