Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना उसाला पहिला हप्ता २९११ रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली.
नागवडे सहकारी साखर कारखान्याने कालच २७०० रुपयाप्रमाणे पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले आहे. कुकडी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पहिली उचल २६०० देणार असल्याचे जाहीर केले होते,
मात्र भावाची स्पर्धा लक्षात घेऊन कुकडी कारखान्याने पहिला हप्त्याच्या भावात वाढ केली असून तो दर २९११ इतका केला आहे. कुकडी कारखाना इतर कारखान्याच्या तुलनेत उशिरा सुरू झाला.
कुकडी कारखान्याचे आतापर्यत नव्वद हजार मेट्रिक टनाच्या आसपास गाळप झाले आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने भावाची स्पर्धा जोरात सुरू आहे.
कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले, कुकडी सहकारी साखर कारखाना हा नेहेमीच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत असणारा सहकारी कारखाना आहे. सहकारी कारखानदारीसमोर अनेक अडचणी असल्या तरी त्यावर मात करून शेतकऱ्याच्या उसाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यावर आम्ही भर देत आहोत.
कुकडीने पहिला हप्ता जाहीर केला असून गाळप केलेल्या उसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारी साखर कारखान्यांनाच ऊस द्यावा असे आवाहनही जगताप यांनी केले.