Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहीर, सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिली. यावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन
युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे एमआयडीसी मंजुर झाली, असा दावा काल शनिवारी (दि.२) पत्रकार परिषदेत केला.

शिर्डीला एमआयडीसी मंजूर झाली असल्याचे वृत्त महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी येथे बुधवारी (दि.२९) प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी तात्कालीन
आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने २०१८ पासून सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून एमआयडीसी झाल्याचा दावा केला.
तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आपण निवडणुकीत एमआयडीसी करण्याचा शब्द दिला होता. निवडून आल्यानंतर २०२० पासून सातत्याने आपण पाठपुरावा केला. महायुतीच्या सरकारमुळे एमआयडीसी मंजूर झाली असून
रोजगाराच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगत आपलाही दावा अधोरेखित केला. तर काल शनिवारी वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेऊन विजय वहाडणे यांनी आपण २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन दिवसांची एमआयडीसी व्हावी, यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.
यावेळी सहा हजार युवकांनी सह्या केल्या होत्या, त्याच्या आधारे आपण सरकारकडे पाठपुरावा केला. नगराध्यक्ष झाल्यानंतर उद्योग मंत्रालयाकडून लेखी पत्र आले होते. मात्र त्यावेळेस काही नेत्यांच्या मानसिकतेमुळे आपण ७०० एकर जमीन उपलब्ध करू शकलो नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
चार महिन्यापूर्वी माझ्या ‘कर्तव्य’ पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंत्री विखे पाटील आले असता त्यांना मी मला संस्थान नको, मला विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या, अशी मागणी केली होती. तेंव्हा मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे युवकांचे स्वप्न झालं पूर्ण, असे विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
वहाडणे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये चाळीस वर्षे यांनी काही केले नाही. परंतु आज मात्र आपणच केल्याच्या बातम्या देऊन, फ्लेक्स लावून, जल्लोष करून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला.
आता तर मतदार संघातील प्रश्नांची यादी सरकारकडे पाठवायची एखादा प्रश्न सुटला तर आम्हीच केले म्हणून सांगायचे, अशी टीकाही वहाडणे यांनी यावेळी प्रस्थापित नेत्यांवर केली.यावेळी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल विनायक गायकवाड त्यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष दवंगे यांनी प्रास्ताविक केले. चेतन खुबानी यांनी आभार मानले.