पाणी जायकवाडीला सोडले फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना ! भूजल पातळीत वाढ, रबीचे पिके जोमात

Ahilyanagarlive24 office
Published:

मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. जायकवाडीला सोडण्यात येणारा कोटा पूर्ण होताच मुळातील विसर्ग थांबवला. परंतु याचा फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना प्रचंड झाला व आगामी काळातही होणार आहे. मुळा नदीपात्रातून २.१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेल्यानंतर भूगर्भातील पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाला आहे. तसेच नदीपात्रातील तळ गाठलेल्या चारही कोल्हापुरी बंधारे भरले आहेत. त्यामुळे आता रबी पिकांसांठी चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील पावसाचाही चिंता मिटली आहे.

कडक उन्हाळा गृहीत धरलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी ‘हिरवळ’

अत्यल्प झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला होता. त्यामुळे नदीकाठी असलेल्या विहिरींची पाणी पातळी पावसाळ्यात खालावली होती. तसेच चारही कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत पाणी अत्यल्प राहिले होते. त्यामुळे २०१६ नंतर पहिल्यांदाच उन्हाळा कडक जाणार, पिकांनाही याचा फटका बसणार हे शेतकऱ्यांनी गृहीत धरले होते. परंतु या पाण्याने आता विहिरी गच्च भरल्या आहेत. बंधारेही भरले आहेत. त्यामुळे ऊस, चारा पिके, गहू, कांदा, हरभरा आदींसह अन्य पिकांना जीवनदान मिळणार असून कडक उन्हाळा गृहीत धरलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी ‘हिरवळ’ असणार आहे.

अवकाळीने पाणीपातळी वाढली

मुळा नदीपात्रातील चारही कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

जायकवाडीसाठी २.१० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मुळा धरणात नव्याने ४४० दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. त्यामुळे अवकाळीने अनेक ठिकाणी नुकसान केले ही जरी एक बाजू असली तरी मुळामध्ये पाणी आवक वाढली असल्याने उन्हाळ्यात याचा फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe