Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी गावची कन्या तेजश्री विष्णू डमाळे हिची भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडून महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तामिळनाडू, बिहार,
पश्चिमबंगाल, सिक्कीम, गोवा, या ठिकाणी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत तेजश्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
पाथर्डी तालुक्याच्या ग्रामीण भागातील या १४ वर्षाच्या युवतीने पाथर्डी येथील एम. एम. निराळी विद्यालयात शिक्षण घेत असताना एस बी नेट क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून
क्रिकेटचा सराव केलाा जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर क्रिकेटमध्ये अतिशय कमी वयात ऑलराऊंडर क्रिकेट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवत महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान पटकावले.
तारकपूर आगारामध्ये बसचालक असलेले विष्णू डमाळे यांची तेजश्री मुलगी असून, अनेक स्पर्धक असताना तेजश्रीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.
या यशाबद्दल तिचे राष्ट्रवादीचे नेते व एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, माजी सभापती संभाजी पालवे, जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे,
डमाळवाडीचे सरपंच अंबादास डमाळे, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, लोहसर गावचे सरपंच अनिल गीते पाटील, पत्रकार विलास मुखेकर यांच्यासह तालुक्यातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.