अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची गोणी छातीवर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर शेतात पिकवलेला कांदा विक्री साठी बाजार समितीत नेण्यासाठी टेम्पोत कांद्याच्या गोण्या टाकत असताना कांद्याची एक गोणी छातीवर पडल्याने बेशुद्ध झालेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथे गुरुवारी (दि.७) सकाळी घडली.

भाऊसाहेब उर्फ नाथा धर्मा गोरे (वय ४५, रा. रई छत्तीसी, ता.नगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.मयत भाऊसाहेब गोरे यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली होती. हा कांदा गोण्यांमध्ये भरून त्यांनी शेतात ठेवलेला होता.

गुरुवारी (दि.७) नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये कांद्याचे लिलाव असल्याने त्यांनी कांदा विक्रीला नेण्यासाठी टेम्पो बोलावला. सकाळी सहाच्या सुमारास ते शेतातील कांद्याच्या गोण्या उचलून टेम्पोत टाकत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले,

त्यांच्या डोक्यावरील कांद्याची गोणी त्यांच्या छातीवर पडून ते गबले गेले व बेशुद्ध पडले. त्यांचे चुलत भाऊ प्रवीण गोरे व इतरांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

मात्र सकाळी ७.२० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना औषधोपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्यांच्यावर दुपारी रई छत्तीसी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, मयत भाऊसाहेच गोरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या मृत्यूप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe