Ahmednagar News : अहमदनगर शहरातील विविध ५ कॅफे शॉपवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी त्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, तोफखाना पोलिसांच्या या कारवाईमुळे कॅफे व्यावसायिकांचे धाबे दणाणून गेले आहे.
८ डिसेंबर रोजी कोहीनूर ऑर्केड बिल्डींगच्या बेसमेंटमध्ये असलेले कॅफ स्टेला, बालिकाश्रम रोड येथील डाऊन कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रोड, येथील हंगरेला कॅफे, प्रेमदान चौक, तारापान शेजारील द व्हेनी कॅफे व पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर, येथील वन स्टार कॅफे या ५ कॅफेंचा कारवाई केलेल्यांमध्ये समावेश आहे.
विवीध कॅफेमध्ये कॅफे शॉपचे चालक हे कॉफी शॉप बोर्ड लावून कॉफी हे पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवून त्यास बाहेरुन पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना प्राप्त झाली. त्यानुसार छापे टाकण्यात आले.
कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना दिसून आला नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधने दिसली नाहीत. अश्लील चाळे करण्यासाठी अडोशाला बनविलेले पडदे तात्काळ काढुन टाकण्यात आले व तेथे मिळून आलेल्या मुला-मुलींना तोंडी समज देवून सोडण्यात आले.
व कॅफे चालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या
मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पो.नि. मधुकर साळवे यांच्या पथकातील पोउनि. सचिन रणशेवरे, पोहेकॉ. दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पोना. अविनाश वाकचौरे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुरज वाबळे, पोकॉ. सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीष तरटे, सतिष भवर यांनी केली आहे.