FD Bank Interest Rate : अलीकडे फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी एलआयसी, पोस्ट ऑफिस आणि बँकेत एफडी करणे सुरक्षित असते. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केल्यास परतावा अधिक मिळतो मात्र तेवढेच नुकसान होण्याची देखील शक्यता असते. यामुळे देशातील अनेक नागरिक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आजही एफडी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
दरम्यान देशातील बँका देखील ग्राहकांसाठी विविध मुदत ठेव योजना सुरु करत आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांनी वेगवेगळ्या मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. अशातच आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील तीन बड्या बँकांनी एफडीच्या विशेष योजना लॉन्च केल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि आयडीबीआय बँक ने या एफ डी च्या विशेष योजना लॉन्च केल्या आहेत. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे सदर बँकांनी जाहीर केलेली एफडी ची योजना नेमकी काय आहे हे जाणून घेणे ग्राहकांसाठी अति आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण या तिन्ही बँकांच्या एफडीच्या नव्याने जाहीर झालेल्या योजना थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अमृत कलश एफडी स्कीम : एसबीआय ने एसबीआय अमृत कलश स्कीम ही मुदत ठेव ची एक नवीन योजना लॉन्च केली आहे. ही 400 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढे व्याजदर दिले जात आहे. तथापि या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
आयडीबीआय बँक : देशातील बड्या बँकांपैकी एक असलेल्या आयडीबीआय बँकेने देखील एक विशेष एफडी योजना लॉन्च केली आहे. या बँकेने उत्सव एफडी नावाची एक नवीन योजना लाँच केली आहे. या उत्सव एफडी अंतर्गत नागरिकांना 375 दिवसांसाठी तसेच 444 दिवसांसाठी एफडी करता येते. यात 375 दिवसांच्या एफडीत गुंतवणूक केली तर सर्वसामान्यांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढे व्याजदर दिले जात आहे.
आणि जर 444 दिवसांच्या FD मध्ये गुंतवणूक केली तर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर दिले जाणार आहे. एसबीआयच्या एफ डी योजनेप्रमाणेच यामध्ये देखील गुंतवणूक करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत राहणार आहे.
इंडियन बँक : यां बँकेची एफडी योजना ही एसबीआय आणि आयडीबीआय बँकेपेक्षा अधिकचे व्याजदर देणारी ठरू शकते. कारण की इंडियन बँकेत चारशे दिवसांची एफडी केली तर ग्राहकांना तब्बल आठ टक्क्यांपर्यंतचे व्याजदर मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ही बँक चारशे दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25%, ज्येष्ठ नागरिकांना 7.75% आणि सुपर जेष्ठ नागरिकांना आठ टक्के एवढे व्याजदर देणार आहे.