अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक लोक जखमी झाल्याचे, वाहतूक कोंडी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शहरभर उच्छाद मांडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने योजना आखली.
ठेकेदार संस्था पीपल्स फॉर अॅनिमलला कुत्रे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला. परंतु या संस्थेने निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे दाखवण्यासाठी ऑर्गन विकत घेऊन ते समितीसमोर सादर केले. यातून महापालिकेची फसवणूक करत लाखोंची बिले हडप केली असा खळबळ उडवून देणारा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केला आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या क्लिपद्वारे ठेकेदार संस्था, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, छाननी समिती आणि तपासणी समिती यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राठोड यांनी केली.
राठोड यांचा नेमका आरोप काय? :- पीपल्स फॉर अॅनिमल ही संस्था दोन वर्षांपासून कुत्रा निर्बीजीकरणाचा ठेका चालवत आहे. परंतु वास्तविक पहिले तर एकही कुत्रा ही संस्था पकडत नाही. केवळ कागदोपत्री कुत्रे पकडलेले दाखवले, निर्बीजीकरणाचे काम केल्याचे दाखवले गेले आहे.
विशेष म्हणजे विकतचे ऑर्गन पालिकेत जमा करून बिले काढली जातात. पीपल्स फॉर अॅनिमलच्या प्रतिनिधी खन्ना आणि एका अनोळख्या व्यक्तीच्या कॉलचे रेकॉर्डिंग शिवसेनेच्या हाती लागले असल्याचेही राठोड यांनी म्हटले आहे.
यात विकत घेतलेले ऑर्गन कसे कर्मचाऱ्यांनी चोरले आणि परत आपल्याला २०० ऑर्गन अवघ्या ३० हजार रुपयात कसे विकत दिले, हा प्रकार रोखण्यासाठी आपण काय शक्कल लढवली याची कबुली दिलेली आहे.
यावर्षीचा ठेका संबंधित संस्थेला ३ महिन्यासाठी देण्यात आला आहे. प्रतिमहिना ३ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. एकूण बिल ३ महिन्यात ९ लाख रुपयांचे आहे. हे सर्व पैसे ठेकेदार संस्थेने विकत घेतलेले ऑर्गन जमा दाखवून अदा होतील, असा दावा राठोड यांनी केला आहे.
पीपल फॉर अॅनिमल संस्थेचे काय आहे नेमके म्हणणे? :- व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप फेक असून राठोड यांनी केलेले सर्व आरोप पीपल फॉर अॅनिमल या संस्थेने फेटाळले आहेत. राजकीय वादात ते संस्थेला नाहक बदनाम करत असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. संस्थेने महापालिकेला यापूर्वीच ‘सीएसआर’मधून कामाचा प्रस्ताव दिलेला आहे. संस्थेला टेंडरमध्ये इंटरेस्ट नसून दुसरे कोणी टेंडरला तयार असेल तर संस्था यातून बाजूला होण्यासाठी तयार आहे असा खुलासा केला आहे.