Ahmednagar News : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वीही ना. राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून, मराठाबांधवांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल.
शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी ना. विखे, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही, आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही खा. सुजय विखे यांनी दिली.
बोधेगाव, गायकवाड जळगाव, शेकटे बुद्रुक येथे शनिवारी (दि. १६) रोजी साखर वाटप कार्यक्रमासाठी विखे आले असता, येथील सकल मराठा समाजाच्या समजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन खा. विखे यांना देण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
विखे पुढे म्हणाले की, बोधेगावातपंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्णत्वास आली असून, यापुढेदेखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. दि.२२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून,
याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटप करण्यात येत असून, येत्या २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत, लाभधारकांनी या साखरेतून लाडू बनवून श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत, असे आवाहन विखे यांनी उपस्थितांना केले.