आ. राम शिंदे यांची अखेर आ. रोहित पवारांवर कुरघोडी ! आता कर्जत एमआयडीसी ‘या’ जागेंवर होणार, भूसंपादन कसे केले जाणार? मोबदला कसा व किती मिळणार? वाचा सर्व माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून मागील काही दिवसांत वातावरण चांगलेच तापले आहे. आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे.

त्यामुळेच अगदी अंतिम टप्प्यात आलेली एमआयडीसी पुन्हा लांबली कारण एमआयडीसीसाठीची जागा आता नवीन ठिकाणी शोधली जाणार आहे. याच संदर्भात आ. राम शिंदे यांनी महत्वाची बैठक काल रविवारी घेतली.

यात जागा, भूसंपादन, मोबदला आदी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी एमआयडीसीचे विभागीय प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व विभागप्रमुख आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांच्या हिताची एमआयडीसी उभारणार

मतदारसंघासाठी आपण सर्वांच्या हिताची एमआयडीसी उभारणार आहोत. यासाठी सर्व नियम, निकष पूर्ण करणारी जागा संपादित करणे गरजेचे आहे. कर्जत तालुक्यातील ६ ठिकाणची माहिती संकलित केली असून सर्वांना विश्वासात घेत संबंधित अधिकारी आठ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करतील अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

अशी होईल एमआयडीसी व असा असेल मोबदला

कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी औद्योगिक विभागाच्या नियम आणि निकषांनुसार भू-संपादित करणारी जागा समतल आणि सलग क्षेत्र असणारी हवी. तसेच त्या जागेला लागून राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक कंपन्यांसाठी वीज,

पाणी आणि इतर भौतिक सुविधा असणारी ठिकाणे सुचवावेत. भू-संपादन झालेल्या संबंधित जमीन मालकास शासन रेडिरेकनर दराच्या चार पट मोबदला आणि त्याच्या जागेच्या १० टक्के विकसित भूखंड निःशुल्क दराने व्यवसायासाठी देत असल्याचे नितीन गवळी यांनी सांगितले.

 या सहा जागा आहेत विचाराधीन

कोंभळी-रमजान चिंचोली, वालवड-सुपे, पठारवाडी, कुंभेफळ- अळसुंदे-कोर्टी, देऊळवाडी आणि थेरगाव या सहा जागा सध्या विचाराधीन आहेत.

 आ. रोहित पवारांवर कुरघोडी

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु अंतिम टप्प्यात आलेली एमआयडीसी अचानक आ. राम शिंदे यांनी जागेबाबत काही मुद्दे उपस्थित करत ही एमआयडीसी दुसरीकडे हलवली.

आमदार शिंदे यांनी महायुती सरकारच्या पाठबळावर आमदार रोहित पवार यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe