पती-पत्नी, जावई-सासूसासरे हे नाते अत्यंत पवित्र असते. परंतु या नात्याला काळिमा फसवणरी एक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत याठिकाणी रविवारी (१७ डिसेंबर) दुपारी घडली आहे.
पती-पत्नीमधील वादातून जावयाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. राधाबाई महादू चोरमले असे मयत महिलेचे नाव आहे तरसंतोष दौलत शेंडगे (शिरसुले, निघोज, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादी काळुराम चोरमले यांची सर्वात लहान बहिण बानूबाई हिचे संतोष शेंडगे याच्यासोबत विवाह झाला होता. तो काहीच कामधंदा किंवा इतर कामे करीत नव्हता. किरकोळ कारणावरून तो बानूबाईला मारहाण करायचा. याला वैतागून बानूबाई माहेरी चोंभूत येथे राहायला आलेली होती. त्यानंतर तिचा पती संतोष हाही सासरी चोंभूत येथे राहायला आलेला होता.
परंतु त इथेही त्यांच्यात वाद सुरूच होते. नुकतेच त्यांच्यात कडाक्याचे भांडणे झाली होती. यात त्याने पत्नीला झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. राधाबाई या जावई संतोषला समजावून सांगत व भांडणात मध्यस्ती करत असत व याचाच त्याला राग येत असे.
या रागाच्या भरातच त्याने टोकाचे पाऊल उचलले. रविवारी (१७ डिसेंबर) दुपारी दीडच्या सुमारास घराच्या पडवीत सासू राधाबाई चोरमले झोपलेल्या होत्या. त्याचवेळी आरोपी जावयाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. हा घाव इतका वर्मी लागला की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.