Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यात गाजले होते. यातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे कोठडीत होता. दरम्यान त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला.
आता आरोपी स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. या आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी राहील.
नगरसेवक शिंदे, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास शिंदे, महेश नारायण कुन्हे, अभिजित रमेश बुलाख, मिथुन सुनील धोत्रे, अक्षय प्रल्हादराव हाके, राजू भास्कर फुलारी, अरुण अशोक पवार या आरोपींना ताब्यात घेत
मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी अनेक गुन्हे संघटीतपणे केले असून, त्या दृष्टीने तपास करण्यासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांकडून मागण्यात आली. त्यांना आता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिस कोठडी का मागितली?
आरोपींनी संघटीतपणे गुन्हे करून त्यातून आर्थिक फायदा घेत मालमत्ता जमा केली का? गुन्हे करून मिळवलेली रक्कम कोणत्या बँकेत अथवा पतसंस्थेत जमा केलेली आहे का? संघटीतपणे केलेल्या विविध गुन्ह्यातील फिर्यादी व तपासी अधिकाऱ्यांचे तपास व जबाब,
आरोपीने त्यांच्या नातेवाइकांकडे मालमत्ता ठेवली आहे का किंवा त्यांच्या नावावर घेतली आहे का? स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने वाहने खरेदी केली का? आणखी काही गुन्हे केले का ? बेनामी प्रॉपर्टीबाबत तपास करणे आदी तपासासाठी पोलिस कोठडी मागितली आहे.