Ahmednagar Breaking : हुंड्याने घेतला वडील आणि भावाचा बळी…! अहमदनगर जिल्ह्यातील त्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर…

Published on -

सासऱ्याने मागितलेल्या हुंड्याच्या रकमेवरून कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून मुलानेच त्याच्या वडिलांचा आणि भावाचा चाकुने भोकासून खून केला. तर दुसऱ्या भावावर आणि आईवर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील सूरेगाव येथे घडली.

घड्याळ्या हिरामन चव्हाण, महावीर घड्याळ्या चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर आक्रोश घड्याळ्या चव्हाण आणि रिवोन घड्याळया चव्हाण या दोघांना चाकूने वार करत गंभीर जखमी केले.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात रिवोन घड्याळ्या चव्हाण हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी पोलिसांनी आरोपी जावेद घड्याळ्या चव्हाण याला विसापूर परिसरातून अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले.

या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी याचे त्याच्या पत्नीशी वाद झाल्याने ती काही दिवसापूर्वी तिच्या माहेरी निघून गेली होती. पत्नीला माघारी बोलावले असता आरोपींचा सासरा आदिक आजगन काळे (रा.म्हसणे फाटा) याने आरोपी जावेद याला हुंड्याचे दहा लाख रुपये देण्याची मागणी करत तिला सासरी पाठविण्यास नकार दिला.

आरोपी याने त्याच्या पत्नीला घरी आणण्यासाठी वडील घड्याळ्या आणि मुलगा महावीर यांना दहा लाख रुपयांची मागणी करत होता. मात्र पैसे नसल्याने घरात वेळोवेळी वाद होत असे.

गुरुवारी जावेद याने पत्नीला घरी आणायचे असल्याचे सांगत १० लाख रुपयांची मागणी केली. नाही दिले तर तुम्हाला मारुन टाकीन असे म्हणत हातातील चाकु दाखवत पुन्हा वाद घालुन शिवीगाळ करत घड्याळ्या चव्हाण यांच्यावर हातातील चाकुने छातीवर वार करण्यास सुरुवात केली.

घड्याळ्या चव्हाण याला वाचविण्यासाठी मुलगा महावीर हा मध्ये आल्याने जावेद याने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. या वादात जावेद याने त्याची आई रिवोन घड्याळ्या चव्हाण आणि भाऊ आक्रोश घड्याळ्या चव्हाण या दोघांना चाकूने वार करत गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात घड्याळ्या हिरामन चव्हाण तसेच महावीर घड्याळ्या चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News