Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यासह महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात व शहरात मराठा समाज व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने गेल्या अनेक वर्षापासून एकत्रितपणे राहात आहेत.
प्रत्येकाचे गाव पातळीवर सामाजिक, विधायक व व्यवहारीक संबंध अतिशय चांगले आहेत.
सर्वच समाज एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतो. परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय स्वार्थापोटी जातीय तेढ निर्माण करून मराठा व ओबीसी समाज बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचा श्रीरामपूर सकल मराठा समाज निषेध करीत असून अहमदनगर येथे केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत श्रीरामपूर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अप्पर पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक कार्यालयात काल बुधवारी (दि.७) निवेदन देण्यात आले. यावेळी नागेश सावंत, सुरेश कांगुणे, श्रीकृष्ण बडाख यांची भाषणे झाली.
याप्रसंगी अनिल उंडे, शशिकांत गायधने, सुधाकर तावडे, भाऊसाहेब गायधने, राजेंद्र मोरगे, चंद्रकांत शेळके, बाळासाहेब मेटे, चंद्रकांत काळे, दत्तात्रय जाधव, सुनील उंडे, चैतन्य गायधने, प्रसाद खरात, शरद नवले, अमोल बोंबले, निखिल शेळके, सागर थोरात,
गोकुळ गायकवाड, सुधीर गडाख, किशोर घोरपडे, दिलीप थोरात, महेश बोंबले, रावसाहेब भोसले, राजेंद्र भोसले, ऋषिकेश मोरगे, जालिंदर कर्जुले आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांनी अहमदनगर येथील जाहिर सभेत मराठा समाजाच्या भावना दुखवल्या असून त्याच बरोबर नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याची चिथावणी दिलेली आहे.
या संदर्भात आमची तक्रार नोंदवून घेवून गुन्हा दाखल करावा व मराठा समाजाला अशा लोकांपासून तात्काळ संरक्षण मिळवून द्यावे.
आपण सदरचा गुन्हा दाखल न केल्यास आम्हाला आंदोलनात्मक निर्णय घ्यावा, लागेल याची नोंद घेवून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे.