Ahmadnagar Breaking : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये हजेरी लावली होती. दुपारच्या दरम्यान त्या वकीलांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेल्या असता तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांच्यात व सुषमा अंधारे यांत शाब्दिक चकमक उडाली.
तसेच मसनेच्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून जात त्यांना तेथून बाहेर हुसकावून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
याविषयी बोलताना स्मिता आष्टेकर म्हणाल्या, मी एक कट्टर हिंदुत्ववादी महिला आहे. कट्टर हिंदुत्वादी बाळासाहेब ठाकरे यांची मी शिवसैनिक आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या जुन्या भाषणात हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांचा मी निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगर मध्ये येऊन दाखवावे,
त्यांना मी माझा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. पक्षाने त्यांना कोणत्या कारणाने पक्षात घेतले याच्याशी मला काही घेणे देणे नाही परंतु जर आमच्या देवदेवतांचा अपमान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असे आष्टेकर म्हणाल्या.
ऍड. अनिता दिघे म्हणाल्या, जिल्हा न्यायालयात येण्यापूर्वी बार असोसिएशनच्या अध्यक्षांची, न्यायाधीशांची परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु अंधारे यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नाही. येथे येत त्यांनी थेट राजकीय राजकीय भूमिका मांडायला सुरवात केली.
कायद्यापेक्षा राजकीय व्यक्ती मोठ्या असतात असे त्यांनी यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी त्यांचा निषेध केला असे दिघे म्हणाल्या. तसेच त्यांनी अंधारेंच्या देवदेवतांविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध व्यक्त केला.