Shushma Andhare Vs Eknath Shinde : सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्षांनी आगामी निवडणूकीसाठी कोणाला तिकीट दिले गेले पाहिजे यासाठी मंथन सुरू केले आहे.
दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप देखील केले जात आहेत. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठे आरोप केले होते. शिंदे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना खोके नाही तर कंटेनर लागतात, याचा साक्षीदार मीच आहे.
तसेच माझ्या घरावर आंदोलन करण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती असे आरोप केले होते. दरम्यान या आरोपांवर उत्तर देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
उबाठा अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे बालिश आणि व्हेग बोलतात, एखादा उडाणटप्पू बोलल्यासारखं हे बोलणं आहे, त्यांना हे शोभत नाही असे प्रत्युत्तर दिले आहे. खरे तर सध्या राजकीय नेत्यांचे विविध ठिकाणी दौरे आयोजित होत आहेत.
आगामी निवडणुकांसाठी राजकीय नेते जनसंपर्क वाढवत आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे अहमदनगर मध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देतांना असं म्हटलं आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल.
कधी रामदास कदम, कधी श्रीकांत शिंदे, कधी गुलाबराव पाटील, तर कधी दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांची बतावणी ऐकायला मिळेल. तसेच एकनाथ शिंदे यांनी आताच जे वक्तव्य केलं आहे त्याला बतावणीचा प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे असा उपरोधिक टोला देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी लगावला आहे.
एकंदरीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय वातावरण ढवळले गेले आहे. विशेष म्हणजे येत्या काळात राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोप आणि प्रत्यारोप होणार हे यावरून स्पष्ट होत आहे.